पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या कंपनी खरेदी केल्याचा आरोप
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो अनर्थ टळला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फेटाळून लावले आहेत.
सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे तो अनर्थ टळला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी फेटाळून लावले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सारारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी नेहमी प्रमाणे आज कामावर गेले असता त्या ठिकाणी प्रवेशद्वार बदलले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी साई ऍग्रो किड्स असा फलक लावला असल्याचे निदर्शनासं आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी व जागा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी खरेदी केल्याची माहिती त्यांना मिळताच कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी अचानक सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.
यावेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना कामगार म्हणाले, पंडित ऑटोमोटिव्ह ही कंपनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे. ४० कोटीची जागा केवळ ८ कोटी रुपयांमध्ये
खरेदी केली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या दुचाकी कागदपत्रे कंपनीमध्ये असताना. रात्रीच्या वेळी कंपनीचे प्रवेशद्वार बदलण्यात आले आहे. आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला अटकाव केला जात आहे. ३१ जानेवारी पर्यंत आम्ही सर्व कामगार कामावर होतो मात्र १ जानेवारी पर्यंत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आधीच आम्हाला चार चार वर्षे पगार मिळत नाही, त्यासंदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमच्या संसाराची राखरांगोळी केली आहे. राजानेच प्रजेवर अन्याय केला तर न्याय कोणाकडे मागायचा ? राजापुढे प्रजेने जीव द्यायचा का? शिवेंद्रसिंहराजे आमच्या चितेवर पोळ्या भाजत आहेत असा आरोप करत आम्हाला काम करून द्यावे, अशी त्यांनी मागणी केली. यावेळी घटनास्थळी कामगारांचे कुटुंबीय उपस्थित असल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का ? आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीची जागा मी मालकाकडून नव्हे तर न्यायालयाकडून (एनसीइटी) लिलावामध्ये बँक ऑफ बडोदामध्ये पैसे भरून अधिकृतरित्या खरेदी केली आहे. मी जागा खरेदी केल्याची नोंद औद्योगिक वसाहत कार्यालय आणि संबंधित ग्रामपंचायतीला झाली असून आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का? मी इन्कमटॅक्स भरतो ही माझी चूक आहे का? असा प्रतिप्रश्न करत मी कोणावरही अन्याय केला नाही अशी प्रतिक्रिया आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामुदायिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित कंपनीची जागा मी न्यायालयाच्या माध्यमातून अधिकृतरित्या खरेदी केली आहे. मग कंपनी कर्मचाऱ्यांचा विषय गेल्या दोन वर्षापासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मी खरेदी केलेल्या जागेत साई ऍग्रो निड्स ही कंपनी सुरू करण्यात येणार आहे. मुळात संबंधित कर्मचाऱ्यांचे पैसे मी बुडवले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला हा प्रश्नच उपस्थित होत नाही. न्यायालय (एनसीइटी) ही काय प्रक्रिया आहे ही कर्मचाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. मी बँक ऑफ बडोदामध्ये पैसे भरून अधिकृतरित्या जागा खरेदी केली आहे, असे स्पष्टीकरण आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या संपूर्ण घटनेत काही राजकारण आहे का असे विचारले असता ते म्हणाले, आमदार म्हणून मी व्यवसाय करायचा नाही का? मी इन्कमटॅक्स भरतो ही माझी चूक आहे का? उद्या या घटनेवर टीका-टिप्पणीही होईल. मात्र यात काय राजकारण असेल असे मला वाटत नाही.


