गोडोली चौक ते खिंडवाडी अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारवाईचा हातोडा
रस्ता रुंदीकरणातील टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटवल्या
गोडोली चौक ते शिवराज पेट्रोल पंप यादरम्यान रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांच्या टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आल्या. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान विक्रेते आणि पीडब्ल्यूडी चे अधिकारी यांच्या वादावादीचे प्रसंग घडले. मात्र सर्व टपऱ्या हटवण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
सातारा : गोडोली चौक ते शिवराज पेट्रोल पंप यादरम्यान रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांच्या टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आल्या. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान विक्रेते आणि पीडब्ल्यूडी चे अधिकारी यांच्या वादावादीचे प्रसंग घडले. मात्र सर्व टपऱ्या हटवण्यात आल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला.
गोडोली चौक येथील अतिक्रमणांच्या संदर्भातील कारवाई पीडब्ल्यूडी आणि सातारा नगरपालिका यांच्या घोळामध्ये अडकून पडली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा यांच्या माध्यमातून या कारवाईमध्ये लक्ष घालण्यात आले. लिंबखिंड ते खिंडवाडी व गोडोली चौक ते शिवराज पेट्रोल पंप यादरम्यानच्या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये संबंधित टपरी चालकांना बांधकाम विभागाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. सदरचा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार असल्याने वाहतुकीला अडचणी करणाऱ्या टपऱ्यांना कारवाईचे लक्ष करण्यात आले. या मार्गावर अनेक लोखंडी शेड, मोठी दुकाने, पक्की बांधकामे करण्यात आली होती. संबंधितांना टपऱ्या हलवण्यासाठी आठ दिवसाची मुदत देण्यात आली होती. येथे 28 फेब्रुवारी रोजी ही मुदत संपत होती. त्यानुसार बांधकाम विभागाने ही कारवाई केली.
या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे 40 कर्मचारी, दोन ट्रक, जेसीबी व गोडोली पोलीस चौकीच्या मुसळे मॅडम सह पोलीस फौज फाटा या कारवाईसाठी उपलब्ध होता. काही टपरी चालकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्या टपऱ्या हटवण्यात आल्या नाहीत. ही कारवाई सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन पर्यंत सुरू होती. संबंधित रस्ता जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असेल तर नगरपरिषद कोणत्या नियमांतर्गत दंड वसूल करते, असा सवाल येथील पीडित विक्रेत्यांनी केला आहे. या कारवाई दरम्यान विक्रेते आणि अधिकारी कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून ही कारवाई थांबू दिली नाही. अजंठा चौक ते शिवराज पेट्रोल पंप तेथून खिंडवाडी परिसर रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला.


