maharashtra

सातारा जिल्ह्यात बीएसएनएल 178 गावात फोर-जी सेवा सुरू करणार

बीएसएनएलचे वरिष्ठ प्रबंधक राजेश कुमार यांची माहिती

भारत संचार निगम लिमिटेड च्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये फोर-जी आणि फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील 178 गावांमध्ये फोर-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.

सातारा : भारत संचार निगम लिमिटेड च्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये फोर-जी आणि फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील 178 गावांमध्ये फोर-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यात फाईव्ह-जी सेवा लाँच करण्यात येणार असून हे तंत्रज्ञान टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस द्वारे पुरवले जाणार आहे, अशी माहिती भारत संचार निगम लिमिटेडचे सातारा वरिष्ठ प्रबंधक राजेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक प्रबंधक विपणन रियाज पटवेकर उपस्थित होते.
राजेश कुमार पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील 178 गावांमध्ये फोर-जी सेवा सुरू केली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी दोनशे स्क्वेअर मीटर जागेमध्ये 69 ठिकाणी मनोरे उभे केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच फोर-जी सॅच्युरायझेशन उपक्रम देशभरातील 24 हजार 680 कोणतेही नेटवर्क नसलेल्या गावांसाठी मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील 178 गावांसाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत संपूर्णपणे भारतीय बनावटीचे फोर-जी मनोरे उभे केले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 हजार 406 गावांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी 40 मीटर जागा फोर-जी टॉवर बनवण्यासाठी व दोनशे चौरस मीटर जागा प्रति मनोरा तसेच त्यासाठी लागणारी वीज जोडणी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
भूमिगत केबल टाकण्यास विनाशुल्क परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नेटवर्क विरहित गावांमध्ये डिजिटल इंडिया संकल्पनेस पाठबळ मिळणार आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास महाराष्ट्र सरकारने सूचना दिल्या आहेत. भारत संचार निगम लिमिटेड साताराने महसूल खात्याला 15 गावांमध्ये जागांसाठी विनंती पत्र दिले असून उर्वरित गावांसाठी भारत संचार निगम लिमिटेड जागेची पूर्तता भाडेतत्त्वावर करणार आहे. तसेच दुसऱ्या योजनेअंतर्गत भारत ब्रॉडबँड नेटवर्क मदतीने सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्यमी योजनेअंतर्गत हाय स्पीड फायबर इंटरनेट सेवा सुरू केली आहे. ही सेवा 399 रुपये शुल्कात 30 एमबीपीएस स्पीड संपूर्ण महिनाभर पुरवले जाणार आहे.
या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नील डिजिटल इंडिया या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत भारत संचार निगम लिमिटेड ही जबाबदारी पार पाडणार आहे. सातारा जिल्ह्यात बीटीएस चे 578 ग्राहक असून मोबाईल कस्टमर 90,000 आहेत. याकरता सातारा जिल्ह्यात बीएसएनएलला आत्तापर्यंत 360 टॉवर उभारले असून फायबर ऑप्टिकल ब्रॉडबँडचे 7 हजार 800 ग्राहक मिळवण्यात बीएसएनएल ला यश आले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रबंधक रियाज पटवेकर यांनी दिली.