maharashtra

आंतरराज्य टोळीच्या लोणंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या


The inter-state gang's Lonand police caught a glimpse
लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्‍या करुन धुडगूस घालणार्‍या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

खंडाळा : लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्‍या करुन धुडगूस घालणार्‍या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
शाबुद्दीन हनिफ अन्सारी (वय 54, सध्या रा.हडपसर, पुणे मूळ रा.दिल्ली), शकील समी मोहम्मद चौधरी (वय 38, रा.ऐरोली, ठाणे), आजिम अब्दुलरहीम सलमानी (वय 30, रा.गुजरात), नागेश जगन्नाथ चव्हाण (वय 35, सध्या रा.वाघोली, पुणे मूळ रा.दहिगाव ता.कोरेगाव, सातारा) अशी अटक केलेल्या चार संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री लोणंद येथील कंपनीत घुसून अज्ञात टोळक्याने गार्डना मारहाण करत त्यांना बांधून कंपनीतून दीड लाख रुपये किंमतीची कापॅर वायर चोरुन नेली. लोणंद पोलिस या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना त्यांच्या हाती क्लू लागला. त्यानुसार या चोरीतील संशयित उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे येथे असल्याचे समोर आले. यामुळे लोणंद पोलिसांनी दोन पथके तयार केली.
पहिले पथकाने या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपीला हडपसर, पुणे येथून अटक केली. दुसर्‍या पथकाने कुर्ला, मुंबई येथे धाड टाकली असता ते संशयित आरोपी शहापूर जि.ठाणे येथे असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेवून आणखी तिघांना अटक केली. चार संशयित आरोपी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. या घटनेत एकूण सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले.
क्लिष्ट व गुंतागुंत असणार्‍या या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला असून अद्याप इतर संशयितांचा शोध घेणे व मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर, फौजदार गणेश माने, पोलिस हवालदार अविनाश नलवडे, महेश सपकाळ, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, विठ्ठल काळे, फैय्याज शेख, केतन लाळगे, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.