maharashtra

रिक्षा-टॅक्सी वाल्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे

राष्ट्रीय ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आणि त्यांच्या मागण्यांची काळजी घेणारे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सातारा : राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आणि त्यांच्या मागण्यांची काळजी घेणारे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय ऑटो रिक्षा टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष गफार नदाफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, महासचिव आनंद चौरे, उपस्थित होते.
नदाफ पुढे म्हणाले ऑटोरिक्षा टॅक्सी चालक मालकांसाठी सरकारने घोषित केलेले कल्याणकारी मंडळ त्वरित स्थापन करून राज्यातील ओला उबेर बेकादेशीर वाहतूक बंद करण्यात यावी परवानाधारक रिक्षा चालकांना त्याचा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा ऑनलाईन मुक्त परवाने वाटप त्वरित बंद करावेत. मोठ्या संख्येने रिक्षा वाढल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.
शहर परिसरात रिक्षांची संख्या बेसुमार वाढली असून थांबे मात्र मर्यादित आहेत. त्यामुळे ऑनलाईन परवाने तातडीने थांबवण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरटीई बोर्ड मीटिंगमध्ये रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभाग करावा, अशा विविध मागण्यांची मांडणी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री उदय सामंत यांच्याशी वारंवार या संदर्भात चर्चा झाली आहे. मात्र अद्याप या मागण्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. येत्या एक डिसेंबरला राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांचे राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. या अधिवेशनामध्ये या मागण्यांचा ठराव संमत करून पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असल्याचे नदाफ त्यांनी सांगितले.