दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे झालेला लॉकडाउन यामुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे आता कंबरडे मोडण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कुठे बंद कामांना सुरुवात झाली असताना युद्धामुळे भयानक दरवाढीचे संकट कोसळले आहे.
सातारा : दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे झालेला लॉकडाउन यामुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे आता कंबरडे मोडण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कुठे बंद कामांना सुरुवात झाली असताना युद्धामुळे भयानक दरवाढीचे संकट कोसळले आहे. या काळात घरांच्या किमतीमध्ये किमान 40 ते 500 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर वाढ होणार असल्याची माहिती क्रेडाई सातारा संघटनेचे अध्यक्ष सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस संघटनेचे माजी अध्यक्ष जयंत ठक्कर, जॉईंट सेक्रेटरी सागर साळुंखे, मंगेश वाडेकर, राहुल वाखारिया व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सुधीर शिंदे पुढे म्हणाले, मंदी सदृष्य अवस्थेत असलेल्या बांधकाम क्षेत्रास कोरोनाचा चांगलाच धक्का बसला. त्यात भरीस भर म्हणून रशिया आणि युक्रेन युद्धाचाही अप्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षापासून स्टील, सिमेंट व इतर बांधकाम साहित्याच्या किमती सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन ते चार महिन्यांपासून काही वर्षाच्या तुलनेत आता हे दर गगनाला भिडले आहेत. आकडेवारीनुसार या संबंधी तपशीलवार माहिती द्यायची झाल्यास बांधकाम साहित्य पैकी महत्त्वाचा घटक असलेल्या स्टील चा दर वर्षापुर्वी प्रति टन 42 हजार रुपये होता, हा दर आता दुप्पट म्हणजे 84 हजार इतका झाला आहे. सिमेंटचा प्रति पोते दर 260 इतका होते ते आता 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 4 इंच विटाचा दर प्रति हजार मागे 8 हजार रुपये होता तो आता 13 हजार इतका झाला आहे. वाळू व क्रश सँडमध्येही मोठी दरवाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये दरवाढ होणे स्वाभाविक आहे.
संघटनेचे माजी अध्यक्ष जयंत ठक्कर यावेळी म्हणाले, बांधकाम साहित्याबरोबरच इलेक्ट्रिक वायर फिटिंग, स्टाईल, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन ऍल्युमिनियम विभाग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजुरी तसेच प्लंबिंगच्या दरांमध्ये देखील भरमसाठ दरवाढ झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे बांधकाम दरात 400 ते 500 प्रति स्क्वेअर फूट दरवाढ अटळ आहे. बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली दरवाढ नैसर्गिक आहे की, सट्टेबाजीमुळे, नफेखोरीमुळे होत आहे याची देखील सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. सरकारने बांधकाम व्यावसायिकांना थोडी सवलत दिल्यास सर्वसामान्यांसाठी माफक दरात घरे देता येतील. बांधकाम साहित्याच्या किमतीत अशी दरवाढ होत राहिली तर बांधकाम व्यावसायिक आपला व्यवसाय बंद करण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.


