maharashtra

अपहरण करून महिलेच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास पुसेगाव पोलीसांनी केली तीन तासात अटक


Pusegaon police arrested a man who tried to kill a woman by kidnapping her within three hours
छत्रपती शिवाजी चौकातील मोटार पळवून नेऊन लहान मुले व महिलांचे अपहरण करुन महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकास पुसेगाव पोलिसांनी तीन तासात अटक करून गुन्हा उघड करण्यात यश मिळवले आहे.

पुसेगाव : छत्रपती शिवाजी चौकातील मोटार पळवून नेऊन लहान मुले व महिलांचे अपहरण करुन महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकास पुसेगाव पोलिसांनी तीन तासात अटक करून गुन्हा उघड करण्यात यश मिळवले आहे.
अभिजीत ज्ञानदेव फडतरे (वय ३१, राहणार फडतरवाडी, ता.खटाव) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी (दि. २६) जयश्री महेश गोरे, (वय ३५), पती महेश, मुले वेदांतिका (वय ८) व विश्वजीत (वय ४ महिने) राहणार रविवार पेठ, सातारा तसेच नातेवाईक उत्तम होळ व त्यांची मुलगी रुचिका उर्फ रूपाली (वय 21) राहणार  किन्हई, ता. कोरेगाव हे शिंगणापूर येथून साताऱ्याकडे मोटारीने (क्र.एम,एच ११ जी.सी.८१८१) चालले होते. पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकात आल्यावर महेश गोरे व उत्तम होळ हे पाण्याची बॉटल आणण्यासाठी गाडीतून खाली उतरले असता एका अनोळखी इसमाने ड्रायव्हर सीटचा ताबा घेऊन गाडी पळवून नेली. परंतु गाडीतील व्यक्तींनी प्रतिकार करते वेळी झालेल्या झटापटीमुळे ही मोटार येरळा नदीच्या पुलाच्या पुढे बंद पडली. त्यावेळी गाडीतील लोकांनी आरडाओरडा केला असता या अनोळखी इसमाने जयश्री महेश गोरे यांचा गळा दाबून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद जयश्री गोरे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शितोळे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी दोन पोलीस पथके तयार करून त्यांनी मार्गदर्शन केले. पुसेगाव पोलिसांनी छत्रपती शिवाजी चौकातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताचा शोध सुरू केला. त्यात त्यांना एक संशयित इसम पुसेगाव-दहिवडी रस्त्यालगतच्या महालक्ष्मी हॉटेलच्या आडोशाला लपून बसल्याचे आढळून आले. त्यास पोलीस ठाण्यात आणून गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी संशयितास अटक केली. सपोनि संदीप शितोळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईत हवालदार एस. एस. भोसले, डी.बी. बर्गे, सचिन जगताप सुनील अब्दागिरी, महेश पवार, महिला पोलीस पी.एल.जगदाळे यांनी सहभाग घेतला. पुसेगाव पोलिसांनी तात्काळ कसोशीने शोध घेऊन या अति गंभीर गुन्ह्यातील आरोपीस केवळ तीन तासात अटक केल्यामुळे सातारा जिल्हा बार कौन्सिल यांनी पोलिस प्रशासनाच्या कामगिरीची प्रसंशा केली आहे पुसेगाव परिसरातही पोलिसांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.