maharashtra

रॉयल स्टॅग कंपनीच्या दारुच्या बाटलीत आळ्या आढळल्याने रिपाइं आक्रमक

वाईनशॉप व कंपनीवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा अशोक गायकवाड यांचा इशारा

साताऱ्यातील शेटे चौकातील गुलमर्ग वाईन शॉपमध्ये खरेदी केलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या दारुच्या बाटलीत आळ्या, किडे आढळून आलेले असून हा प्रकार म्हणजे दारु पिणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे.

सातारा : साताऱ्यातील शेटे चौकातील गुलमर्ग वाईन शॉपमध्ये खरेदी केलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या दारुच्या बाटलीत आळ्या, किडे आढळून आलेले असून हा प्रकार म्हणजे दारु पिणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याबाबत निवेदन दिले असून अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. संबंधित कंपनी व त्या कंपनीच्या दारु विक्री करणाऱ्या गुलमर्ग वाईन शॉपवर कारवाई करा अन्यथा वाईन शॉप व प्रशासनाच्या दारात तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सातारा जिल्हा रिपाइंचे (आठवले गट) अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रिपाइंचे पदाधिकारी ज्या दारुच्या बाटलीत अळ्यात सापडल्या आहेत ती बाटलीच घेवून हजर होते. आप्पा तुपे यांच्यासह अशोक गायकवाड यांनी याबाबत घडलेली माहिती दिली. रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनीच गुलमर्ग वाईन शॉपमध्ये ही रॉयल स्टॅग कंपनीची दारु खरेदी केली होती. त्यावेळी बाटलीत अळ्या व किडे असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर रिपाइंतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून संबंधित दुकान व कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अशोक गायकवाड म्हणाले, गुलमर्ग वाईन शॉपमध्ये खरेदी केलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या बाटलीत अळ्या आढळून आलेल्या आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन कारवाई न करता गप्प राहिलेले आहे. वास्तविक आमच्या तक्रारीनंतर त्यांनी तातडीने गुलमर्ग वाईन शॉपमधील संबंधित कंपनीच्या बॅचचा जो माल आला आहे तो ताब्यात घेण्याची गरज होती तसेच दुकान सील करायला हवे होते. मात्र, कोणतीच कारवाई झालेली नाही.

लोकांच्या जीवाशी कशासाठी खेळता ?
राज्यात अनेक ठिकाणी विषारी दारुमुळे बळी गेल्याच्या दुर्देवी घटना आहेत. एका नामांकित कंपनीच्या दारुच्या बाटलीत अळ्या असतील व ती पिल्यानंतर जर लोकांना त्रास झाला तर जबाबदार कोण राहणार ? आता 50 टक्के लोक दारु पितच असतात. मग या नागरिकांना अशा प्रकारची विषारी दारु विक्री होत असेल तर तातडीने कारवाई करण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांनी गुलमर्ग वाईन शॉप सील करावे तसेच रॉयल स्टॅग कंपनीच्या मालाचा जो बॅच क्रमांक असलेला दारुचा माल नेमका कोणत्या कारखान्यातून आला, तो कारखाना व त्या बॅचचा माल सील करुन याप्रकाराची सखोल तपासणी करण्याची गरज आहे. लोकांच्या जीवाशी कशासाठी खेळता ? असा आमचा सवाल असून प्रशासनाने तातडीने याबाबत कारवाई करावी. अन्यथा रिपाइं दारु विक्री दुकानासमोर व प्रशासनाच्या दारात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.