आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
सातारा : खानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामावर सरकारने बुलडोझर फिरवला. सरकारने उचललेल्या या पाऊलाचं शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
या पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे असं त्यांनी उल्लेख केला.
तसेच आजही शिवभक्तांना ही घटना प्रेरित करत असते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट-साऊंड शो सुरू करण्याबाबत हिंदू एकता आंदोलन, सातारा व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे. त्यावर संबधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना दिले आहेत. शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे.


