maharashtra

दस्तगीर कॉलनी मध्ये घुसलेले तरस वनविभागाकडून तात्काळ ताब्यात

सुहास राजेश शिर्के यांचा पुढाकार

सातारा शहराच्या मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक तरस दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. कॉलनी मधील कुरेशी वस्तीमध्ये या तरसाने दाट झुडपाचा आश्रय घेतल्याने वनविभागाला त्याला ताब्यात घेताना बऱ्याच प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

सातारा : सातारा शहराच्या मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक तरस दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. कॉलनी मधील कुरेशी वस्तीमध्ये या तरसाने दाट झुडपाचा आश्रय घेतल्याने वनविभागाला त्याला ताब्यात घेताना बऱ्याच प्रयत्नांची शर्थ करावी लागली. मात्र तात्काळ पिंजरा लावून तरस ताब्यात घेण्यात आले आणि त्याला बामणोलीच्या दाट जंगलामध्ये सोडून देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सातारा शहरातल्या मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनी चा भाग हा डोंगर परिसराच्या उताराचा असून येथे अनेक छोट्या मोठ्या वस्त्या आणि झुडपांचे साम्राज्य आहे. शुक्रवारी सकाळी अचानक या वस्तीमध्ये तरस आढळून आल्याने नागरिकांची भीतीने एकच पळापळ झाली. या तरसाने मार्ग चुकल्याने दोन तीन घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी या प्रकाराची कल्पना या प्रभागाचे माजी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांना दिली. त्यांनी तात्काळ सातारा वनविभागाचे वनपरिक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांना या प्रकरणाची फोनवरून कल्पना दिल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम पिंजऱ्यासह दस्तगीर कॉलनीमध्ये हजर झाली. दरम्यान मंगळवार पेठ मध्ये तरस घुसल्याची बातमी प्रभागात पसरल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कुरेशी कॉलनीमध्ये छोट्या मोठ्या झुडपांच्या दाट जाळ्या असून या जाळीमध्ये शिरण्याचा तरसाने प्रयत्न केला. डॉक्टर चव्हाण यांच्या रेस्क्यू पथकाने काही घरे आणि दाट जाळीच्या मधोमध पिंजरा लावून त्या तरसाला मोठ्या हिकमतीने पिंजऱ्यात ढकलले. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
सकाळी काही महिलांना तरसाचे दर्शन झाले होते. मात्र ते कुत्रे असल्याचे समजून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही नागरिकांनी तरसाला हटकण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या अंगावर धावल्याने खरा प्रकार लक्षात आला आणि मग नागरिकांची पळापळ सुरू झाली. या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी कमालीचे प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात ठेवत वनविभागाला योग्य ते सहकार्य केले. वनविभागाच्या हद्दीत दाट जंगलात तरसाला सोडून देण्यात आले आहे.