maharashtra

काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाजल्या भाकरी

केंद्र शासनामुळे वाढलेल्या महागाईचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

देशातील बेरोजगारी आणि महागाई विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदींसाठी  भाकरी थापल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

सातारा : देशातील बेरोजगारी आणि महागाई विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदींसाठी  भाकरी थापल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने आज देशभरात आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सातारा येथे आंदोलन करण्यात आले. प्रथम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनाशक वस्तूंच्यावरील अन्यायकारक जीएसटी, देशभरात सातत्याने होणारी इंधन दर वाढ विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. देशातील जनतेचे कंबरडे आधीच महागाईने मोडले आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर गगनाला भिडले असून आता सरकारने खाण्याच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावला आहे. विशेषतः या देशातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील जीएसटी द्यावा लागणार आहे. उपचारावर जीएसटी लावण्याचे पाप केंद्र सरकारने केले असून जनता आता त्रस्त झाली आहे. या सरकारला महागाईचे सोयरसुतक नसून सरकारमधील काही मंत्री महागाई वाढत असेल तर खाणे पिणे बंद करा, असे संताप जनक वाक्य वापरून जनतेच्या भावनांचा खेळ करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलकर्त्यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी व्यक्त केल्या.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी रस्त्यावर चूल मांडून त्याच्यावर दोन भाकरी थापल्या. त्या भाकरी काँग्रेसच्या महिला आघाडीमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भाजप हटाव, देश बचाव, मोदींना हटवा, महागाई घालवा अशा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. आंदोलनात महिला पदाधिकारी सुषमाराजे घोरपडे, मनीषा पाटील, धनश्री महाडिक, अल्पना यादव, अन्वर पाशाखान, दत्तात्रय धनावडे, नरेश देसाई आदींनी सहभाग घेतला.