शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिलांना सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
सातारा : शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन महिलांना सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि.२२ नोव्हेंबर २०१३ रोजी महिला पोलीस वैशाली बाळकृष्ण नेवसे या आपल्या पथकासह केशर सुरेश बोडरे, रा. मुंजवडी, ता. फलटण यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दारूच्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेल्या असता अश्विनी कांतीलाल मदने, सुनीता सुनील माने, कल्पना बजरंग जाधव सर्व राहणार मुंजवडी यांनी एकत्र येऊन केशर बोडरे यांची अटक टाळण्यासाठी महिला पोलीस वैशाली नेवसे व त्यांच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करून त्यांना मारहाण केली होती. याबाबत मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर्यन साळुंके यांनी करून संबंधित महिलांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी तिसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये साक्षीदारांनी निर्भीडपणे दिलेली साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश राजेभोसले यांनी वरील तीन महिलांना सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दरम्यान तीन आरोपी महिलांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
खटल्याच्या कामी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पो.नि.धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, सुधीर खुडे, गजानन फरांदे, रेहाना शेख अश्विनी घोरपडे यांनी मदत केली.


