maharashtra

अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी तळबीड पोलिसांची मोठी कारवाई


अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी तळबीड पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुमारे 83 लाखांच्या गुटख्यासह एक कोटी तेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी तळबीड पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे 1 कोटी 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशान्वये दिनांक 21 फेब्रुवारी रोजी तर तळबीड पोलीस ठाणे अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली होती. त्यादरम्यान तळबीड पोलिसांना माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यासाठी बंदी असलेला गुटखा कर्नाटक राज्यातून आयशर ट्रक क्रमांक केए 32 एए 3770 मधून नेण्यात येत आहे. माहिती मिळाल्यानंतर याबाबत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे तसेच पोलीस फौजदार वाकले, पोलीस हवलदार ओंबासे, पाटील, विभुते, शिंदे यांनी पोलीस ठाण्यातून बाहेर पडून सरकारी व खाजगी वाहनाने मसूर रोडवर जात माहिती मिळालेल्या गाडीची वाट पाहिली. पहाटे पावणे चारच्या दरम्यान संबंधित गाडी कराड कडून आली. ही गाडी थांबवून चालकास त्याचे नाव, गाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मोहम्मद त्याजुद्दीन सैफुनसाब वालवाले राहणार नरोना, तालुका आलम, जिल्हा गुलबर्गा, राज्य कर्नाटक असे सांगितले. त्यावेळी गाडीमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने गाडीमध्ये कोंबडी खाद्य असल्याचे सांगितले. परंतु मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गाडीमधील मालाची खात्री करण्याची असल्याने दोन पंचांना बोलावून घेऊन शहानिशा करून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 83 लाख 9 हजार 296 रुपये किमतीचा 5 हजार 744 किलो वजनाचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा सापडला. हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद त्याजुद्दीन सैफुनसाब वालवाले राहणार नरोना, तालुका आलम, जिल्हा गुलबर्गा, राज्य कर्नाटकआणि व मेहबूब बाबुमिया राहणार उडबल तालुका हुमनाबाद जिल्हा बिदर राज्य कर्नाटक या दोघांविरोधात तळबीड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत. या कामगिरीबद्दल पोलिसांचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.