खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी दोघांना अटक
संशयित व मृत हे आतेभाऊ; खूनाचे नेमके कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.
सातारा : पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.
सुनील रखमाजी डोंगरे (वय 33, रा.पिंपरी चिंचवड), मधुकर सोमजी सोनवणे (वय 51, रा.कोठरबन, जि.बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून दोघांना 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे. अमोल सिताराम डोंगरे (वय 28) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी अमोल यांची पत्नी काजलने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
गेल्या आठवड्यात पाण्यावर तरंगत सापडलेल्या युवकाच्या मृतदेहानंतर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) तपासाला सुरुवात केली. चार दिवसानंतर डीबी पथकाला अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आणि तपासाला दिशा मिळत गेली. दोघांना ताब्यात घेवून त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली. मात्र नेमके कारण काय? याचा अद्याप उलगडा होत नसल्याने पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत. तसेच तांत्रिक तपास देखील अद्याप सुरु आहे.
सुनील रखमाजी डोंगरे, मधुकर सोनवणे व मृत अमोल डोंगरे हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. मृत अमोल व संशयितामध्ये पार्टरनशीपमध्ये वाहन आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी ते कोल्हापूर दिशेने एकत्र निघाले होते. सातारा शहराजवळ खिंडवाडी येथे आल्यानंतर संशयितांनी खाणीजवळ वाहन थांबवले. तेथे पाण्यालगत खेकडे दिसल्याने त्यांनी खेकडे पकडण्यास सुरुवात केली. अमोल बेसावध असतानाच संशयितांनी त्याच्यावर लोखंडी हत्याराने डोक्यात हाणले व त्यातच अमोल पाण्यात पडला. हा सर्व घटनाक्रम सकाळी 9 ते 10 वाजताचा आहे. अमोलचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यानंतर संशयितांनी मृतदेहावरील कपडे काढून पुरावा नष्ट करण्यासाठी पाण्यात मृतदेह सोडून दिला असल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
पोलिस अधक्षिक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोनि भगवान निंबाळकर, पोनि वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, फौजदार उस्मान शेख, पोलिस हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, ज्योतीराम पवार, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


