सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्राथमिक कार्यक्रम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनांवर हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी संपलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून एकूण 59 हरकती नगरपरिषद संकलन कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दिनांक 19 व 20 रोजी सुनावणी होणार आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्राथमिक कार्यक्रम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनांवर हरकतींचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी संपलेल्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून एकूण 59 हरकती नगरपरिषद संकलन कक्षाकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर दिनांक 19 व 20 रोजी सुनावणी होणार आहे.
या सुनावणी प्रभारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर घेतल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड आणि मेढा नगरपंचायत यांची सार्वत्रिक निवडणूक येत्या नव्वद दिवसावर येऊन ठेपली आहे. निवडणुकांच्या संभाव्य तारखा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. नगरपरिषद संकलन कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना संदर्भात एकूण 59 हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये सातारा पालिकेच्या सर्वाधिक 25 हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. रहिमतपुर, फलटण प्रत्येकी आठ, महाबळेश्वर चार, पाचगणी 2 व कराड 5, वाई 7 अशा हरकती नोंदवल्या गेल्या असून म्हसवड पालिकेसाठी एकही हरकत आली नाही. प्रारुप प्रभाग रचनेसाठी मेढा नगर पंचायतीच्या संदर्भातही कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही. या हरकतींवर 30 मे रोजी पर्यंत सुनावणी घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
सातारा व कराड पालिका प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या तीस हरकतींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य दालनात प्रभारी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. तर फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मेढा नगरपंचायत इथून दाखल झालेल्या 30 हरकतींवर दिनांक 20 रोजी सकाळी साडेदहा वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीच्या अनुषंगाने संबंधित तक्रारदारांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्या-त्या क्षेत्रातील मुख्याधिकार्यांनी संबंधितांना केले आहे.
सातारा, फलटण, कराड नगरपालिका प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला, तर म्हसवड, रहिमतपुर, वाई, महाबळेश्वर, पाचगणी पालिका व मेढा नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचनेचा अहवाल पुणे महसूल विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यात 6 जून पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल असा अंदाज आहे.


