ज्येष्ठ नागरिकाच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
सातारा : ज्येष्ठ नागरिकाच्या घरात झालेल्या चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
चैतन्य शिरीष गोगटे वय 21, राहणार मंगळवार पेठ, सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री शिव दिन जनार्दन कुलकर्णी वय 77, रा. मंगळवार पेठ, सातारा यांच्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र आणि मोबाईल हँडसेटची चोरी केली होती. याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.
हा गुन्हा ज्येष्ठ नागरिकाच्या वयाचा फायदा घेऊन ओळखीच्या व्यक्तीने केला असल्याचा संशय असल्याने कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेची संपर्क साधला होता. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करून त्यांना हा गुन्हा उघड करण्याचे आदेश दिले होते.
गुन्ह्याच्या समांतर तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलकर्णी यांच्या ओळखीचे तसेच त्यांच्या घरी येणाऱ्या लोकांविषयी माहिती प्राप्त केली. त्याप्रमाणे तपास पथकास कुलकर्णी यांच्या घरी येणाऱ्या एकावर संशय निर्माण झाला. दरम्यान दिनांक 17 डिसेंबर रोजी या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तो करंजे नाका येथे विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास करंजे नाका सातारा येथे जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने करंजे नाका सातारा येथे जाऊन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात चोरीस गेलेले एक लाख 25 हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल हँडसेट असा चोरीस गेलेला एक लाख 29 हजार रुपये किमतीचा पूर्ण मुद्देमाल सापडला. हा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला असून संशयित आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाई करता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, विजय कांबळे, अतिश घाडगे, संजय शिर्के, शरद बेबले, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाने, रोहित निकम, विक्रम पिसाळ, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला. या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


