मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मुंबई : मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळाने 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे.
एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले आहे. सरकारने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले तरी कामगारांनी ते धुडकावले आहे. त्यातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात हजर व्हावे, असे आवाहन आंदोलक नेते आ. सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (शुक्रवारी) सांगितले. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने संपाचा तिढा कायम आहे.
एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण पर्याय उपलब्ध : अनिल परब
गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारित आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अनिल परब म्हणाले.
अनिल परब म्हणाले, सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही. इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ, आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.


