किरपेत पुन्हा ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन
ग्रामस्थांमध्ये घबराट : वनविभागाच्या पिंजऱ्याला बिबट्याचा गुंगारा
किरपे, ता. कराड येथील परिसरात शनिवारी पुन्हा ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. परंतु, बिबट्याने या पिंजऱ्याला गुंगारा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
कराड : किरपे, ता. कराड येथील परिसरात शनिवारी पुन्हा ऊसतोड मजुरांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. परंतु, बिबट्याने या पिंजऱ्याला गुंगारा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
गुरुवारी २० रोजी सायंकाळी किरपे येथील शेतात बिबट्याने राज धनंजय देवकर या ५ वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांचे वडील धनंजय देवकर यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याला प्रतिकार केल्याने ते बिबट्याच्या तावडीतून मुलाचा प्राण वाचवण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर वनविभागाने शुक्रवारी त्या ठिकाणासह परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. परंतु, वनविभागाच्या पिंजऱ्यालाही बिबट्याने गुंगारा दिला आहे.
आज शनिवारी २२ रोजी सकाळी परिसरातील दक्षिण तांबवे ता. कराड येथे बिबट्याने ऊसतोड मजुरांना दर्शन दिले. तसेच दुपारी परिसरातील सुतारकी नावाच्या शिवारात संतोष गवळी यांच्या शेतात ऊसतोड करत असलेल्या मजुरांच्या समोरच बिबट्या ऊसात शिरला. त्यामुळे ऊसतोड मजुरांनी ऊसतोड बंद केली आहे.
दरम्यान, वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. परंतु, शुक्रवारी रात्री बिबट्याने वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला गुंगारा दिला असून बिबट्या पिंजऱ्याभोवती फिरताना आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे किरपे, तांबवेसह दक्षिण व उत्तर तांबवे, गमेवाडी, आरेवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


