maharashtra

शेतकरी संघटनेचे ६ मार्च पासून कांद्याच्या माळा घालून आंदोलन

केंद्राच्या आयात निर्यात धोरणाचा होणार निषेध

केंद्र शासनाच्या आयात निर्यातीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना ६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची माहिती शेतकरी संघटनेच्या शंकर गोडसे यांनी दिली आहे.

सातारा : केंद्र शासनाच्या आयात निर्यातीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना ६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची माहिती शेतकरी संघटनेच्या शंकर गोडसे यांनी दिली आहे.
या आंदोलनाविषयी बोलताना गोडसे म्हणाले, यावर्षी बाजारात आलेला लाल कांदा तसेच रब्बी कांद्याचे पीक अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झालेली असून, शेतकरी प्रचंड तणावाखाली आलेला आहे. परंतु सत्तासंघर्षपलीकडे राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. जगभर कांद्याला चांगली मागणी असताना कांदा निर्यातीला चालना देण्याऐवजी शेतकऱ्यांना डुबवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी उदासीन धोरणाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 6 मार्च पासून होळी सणाचे औचित्य साधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात, घरादाराला व दुकानांना तसेच आपापली मोटरसायकल, ट्रॅक्टर इत्यादी साधने तसेच सरकारी बसेस व रेल्वे तसेच सरकारी कार्यालयाला कांद्याच्या माळा घालून सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात उतरून कांदा आंदोलनाची तीव्रता वाढवावी, होळी सणाच्या दिवशी आपापल्या तहसील कार्यालयाला कांद्याच्या माळा अर्पण करून निषेध नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघर्ष समितीने केले आहे.
कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान २५००/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, कमी दराने खरेदी झालेल्या लाल व रांगडा कांद्याला फरकाचे अनुदान मिळावे, कांदा निर्यातीस तातडीने चालना मिळावी, या मागण्या शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय, सातारा या ठिकानी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्याया विरोधात प्रत्येक शेतकऱ्यानी आपापल्या क्षमतेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वखर्चाने कांदे किंवा कांदेच्या माळा घेऊन आंदोलनासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन शेतकरी संघटना किसान मंच महाराष्ट्र कार्याध्यक्ष शंकर अण्णा गोडसे यांनी केले आहे.