वर्ये गावातील दलित बांधवांचा लॉंग मार्च चा इशारा
रिपाई गवई गटाची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
वर्ये, तालुका सातारा येथील मागासवर्गीय वस्तीतील वहिवाटीचा रस्ता जातीय द्वेषापोटी रोखण्यात आला आहे, अशी तक्रार रिपाई गवळी गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
सातारा : वर्ये, तालुका सातारा येथील मागासवर्गीय वस्तीतील वहिवाटीचा रस्ता जातीय द्वेषापोटी रोखण्यात आला आहे, अशी तक्रार रिपाई गवळी गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडून दाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ रिपाई कार्यकर्त्यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, वर्ये, तालुका सातारा येथील बौद्ध, मातंग, चर्मकार, गोसावी समाजातील वस्तीचा रस्ता जाणीवपूर्वक रोखण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना हक्काचा वहिवाटीचा रस्ता उरलेला नाही. जातीय द्वेषापोटी जिल्हा प्रशासन न्याय देण्यास विलंब करत आहे. या कामात चालढकल होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.
या प्रकरणी न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय ते राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे, असा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.


