maharashtra

मुदत संपुष्टात येवूनही 'टोळधाड' वाहनधारकांच्या मानगुटीवरच

टोल वसुलीला मिळाली २५ जूनपर्यंत मुदतवाढ

Even after the expiration of the term
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोल नाक्यांवरील टोल वसुलीची मुदत संपुष्टात येत असल्याने आतातरी 'टोळधाड' थांबेल अशी वाहनधारकांमध्ये निर्माण झालेली आशा अखेर फोल ठरली आहे. या टोल नाक्यांच्या टोल वसुलीला २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- गजानन चेणगे
सातारा : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोल नाक्यांवरील टोल वसुलीची मुदत संपुष्टात येत असल्याने आतातरी 'टोळधाड' थांबेल अशी वाहनधारकांमध्ये निर्माण झालेली आशा अखेर फोल ठरली आहे. या टोल नाक्यांच्या टोल वसुलीला २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून वीस वर्षांपूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. या महामार्गाची देखभाल व टोल वसुलीसंदर्भात त्यावेळी करार करण्यात आला होता. त्यानुसार महामार्गावरील शेंद्रे ते कागल या जवळपास एकशे वीस किलोमीटरच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात तासवडे येथे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी येथे टोल नाके आहेत.
या टोलनाक्यांवर यापूर्वी अनेक वेळा टोल वसुलीच्या कारणातून राडे झाले आहेत. मुळात टोलचे दर भरमसाठ असताना वेळोवेळी त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आधीच इंधन दरवाढीने वाहनधारक मेटाकुटीला आले असताना लादल्या जाणाऱ्या टोल भाववाढीमुळे वाहनधारकांमध्ये संतापाची भावना आहे.
टोल नाक्यावर लावलेल्या भव्य फलकावर पारदर्शकता दर्शवण्यासाठी म्हणून ठेक्याविषयीचा तपशील दिला आहे त्यावर टोलवसुलीच्या ठेक्याची मुदत ३ मे २०२२ रोजी संपत असल्याची नोंद आहे. अनेक चाणाक्ष वाहनधारकांनी याची विशेष 'नोंद' ठेवली होती. त्याविषयी निरनिराळ्या ग्रुपमध्ये चर्चा होत होती. आता ३ मेपासून टोलचा अनेक वर्षांचा जाच 'बहुतेक' थांबणार अशी अनेकांना आशा वाटत होती. पण ती आता फोल ठरली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
तासवडे आणि किणी या दोन्ही टोल नाक्यांवर होणाऱ्या टोल वसुलीला आता २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या मुदतवाढीला कोरोनाचे  निमित्त मिळाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी संसर्गाचा प्रकोप झाला तेव्हा शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. परिणामी ५३ दिवस महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. शासन निर्णयानुसार त्या काळात टोलवसुली बंद ठेवण्यात आली होती. करारानुसार या ५३ दिवसातील टोलवसुली होणे आवश्यक होते. तो टोलचा महसूल मिळाला नसल्याचे कारण पुढे करून राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल वसुलीला मुदतवाढ देण्याची मागणी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली होती. गेले काही दिवस त्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मुदतवाढीचा प्रस्ताव मान्य केला आहे.
५३ दिवसांच्या हिशेबाने २५ जूनपर्यंतची मुदत टोलवसुलीसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची टोलच्या जाचातून सुटका झालेली नाही. निदान २५ जूनपर्यंत तरी त्यांना असेल तो टोल निमूटपणे भरावा लागणार आहे. दरम्यान, या काळात करारानुसार महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी देखील संबंधितांना पार पाडावी लागणार आहे.