maharashtra

कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव संपन्न

महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद : विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण

Education Festival of Karad Panchayat Samiti
कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

कराड : कराड पंचायत समितीचा शिक्षण महोत्सव उत्साहात संपन्न झाला. दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाची शुक्रवारी ११ रोजी सांगता झाली. महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
येथील जुन्या कोयना पुलानजीक दैत्यानिवारीणी मंदिराजवळील पंचायत समितीच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी 10 व शुक्रवारी 11 अशा दोन दिवसिय शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संसर्गामुळे गेली दोन वर्ष शिक्षण महोत्सव होऊ शकला नव्हता. परंतु, या वर्षी कोरोनाचा संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने शासनाने विविध निर्बंध श्थिल केले आहेत. त्यामुळे या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दरम्यान, शिक्षण महोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छ सुंदर शाळा ग्राम स्पर्धेत तालुक्यातील गुणानुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. त्यातील प्राथमिक स्तरामध्ये जिल्हा परिषद शाळा उंडाळे (विभागून प्रथम) व जिल्हा परिषद शाळा भोळेवाडी, सुपने (विभागून प्रथम) असा विभागून क्रमांक देण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळा वनश्रीनगर, ओंड (द्वितीय), जिल्हा परिषद शाळा कुसूर, कोळे (तृतीय), तर जिल्हा परिषद शाळा कचरेवाडी, हेळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
उच्च प्राथमिक स्तरामध्ये जिल्हा परिषद शाळा जिंती, उंडाळे (प्रथम), जिल्हा परिषद शाळा केसे, सुपने आणि जिल्हा परिषद शाळा सैदापूर, कोपर्डे हवेली यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर जिल्हा परिषद शाळा रेठरे खुर्द, वाठार (तृतीय) व जिल्हा परिषद शाळा मुले, कोळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
तसेच आदर्श वर्ग स्पर्धेमध्ये तालुक्यातील गुणानुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. इयता पहिली- उमादेवी काटकर, भोलेवाडी (प्रथम), अश्विनी देव, रेठरे बुद्रुक (द्वितीय)  व सुजाता कुंभार, साजूर (तृतीय), दुसरी- स्वाती आघाव, वडगाव हवेली  (प्रथम), प्रेरणा मोरे, तांबवे (द्वितीय) व रंजना पाटील, सैदापूर (तृतीय), तिसरी- आशाताई निकम- कोर्टी (प्रथम),  अमित कुंभार, तुळसण (द्वितीय)  व महेश लोखंडे, वडगाव हवेली (तृतीय) आणि चौथी- मनीषा रामुगडे, उंब्रज मुली (प्रथम), मनीषा साठे, दक्षिण तांबवे (द्वितीय ) व शीतल पाटील, सुपने (तृतीय) असे क्रमांक देण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम तालुका स्तर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वाघेश्वर, मसूर (प्रथम) जिल्हा परिषद शाळा वडगाव, पेम्बर (द्वितीय) व जिल्हा परिषद शाळा नांदलापूर, मलकापूर (तृतीय) क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तसेच शैक्षणिक स्टॉल स्पर्धेचे तीन क्रमांकाचे बक्षीस वितरणही मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, सुरेखा जाधव, गणपत हुलवान, मंगल गलांडे, सागर शिवदास, प्रियंका ठावरे, प्रदीप पाटील, विनिता पलंगे, शंकर खबाले, निवास थोरात, शामबाला बोडके, पंचायत समिती सदस्य शरद पोळ, मनीषा पाटील यांच्यासह अन्य सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.