केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे काल निवडणूक आयोगाच्या सुनावणीत देखील शिवसेनेकडून तीन आठवड्यांचा वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर दोन्ही गटासाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही गटाकडून खरी शिवसेना आपली असल्याचा दावा केला जात होता. शिंदे गटाने तर 40 आमदार, 12 खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे शिंदे गटाने त्याबाबतचे कायदेशीर पुरावे देखील निवडणूक आयोगाकडे देखील सादर केले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून देखील काही कागदपत्रे जमा करण्यात आले होते. दोन्ही बाजूने आपापली भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. ठाकरे गटाकडून आणखी वेळ मागवण्यात आला होता. पण निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळत आज दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाने काल जबाब नोंदवला होता. तर आज शिवसेनेच्या ठाकरे गटाने जबाब नोंदवला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची सलग चार तास बैठक चालली. या बैठकी याबाबतचा निर्णय घेण्यात आला.