maharashtra

कचरामुक्त सातारा शहराचा दिल्लीमध्ये गौरव

देशपातळीवर 15वा, तर राज्य पातळीवर सातारा पालिकेचा चौथा क्रमांक

Glory to Satara city in Delhi
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात सातारा पालिकेचा शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात गौरव झाला. केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव दुर्गशंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कचरामुक्त शहराचा विशेप सन्मान स्वीकारला.

सातारा : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरे या सर्वेक्षणात सातारा पालिकेचा शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात गौरव झाला. केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव दुर्गशंकर मिश्रा यांच्या हस्ते पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी कचरामुक्त शहराचा विशेप सन्मान स्वीकारला. 4532.02 गुणांच्या बळावर पालिकेने देशात 15 वा तर राज्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.
कचरामुक्त सातारा पालिकेला देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला. याच पुरस्काराचे वितरण शनिवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात येथील कार्यक्रमात करण्यात आले. हा पुरस्कार सातारा शहराचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शानदार सोहळ्यात स्वीकारला. सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन विशेष आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंर्तगत कचरा संकलन, कचऱ्यापासून खतनिर्मिती, ओडीएफ प्लस प्रवर्गात विशेष कामगिरी या विविध उपक्रमांमुळे शहरी स्थानिक संस्थाच्या सरासरी मानकांप्रमाणे सातारा पालिकेने 6000 गुणांपैकी 4532.02 गुण प्राप्त केले. सेवा पातळी मानकांमध्ये सातारा शहराला 2400 पैकी 2072 गुण प्राप्त झाले आहेत. ही कामगिरी देशपातळीवर 15 व्या तर राज्य पातळीवर चौथ्या क्रमांकाची ठरली आहे. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी सोशल मिडियावर या कार्यक्रमाची माहिती व छायाचित्रे अपलोड केली.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सातारा शहरात घरगुती कचरा हा विलगीकरण केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई-कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलगीकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.
याचबरोबर प्लॉस्टिक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुनर्वापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत.
नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोमायनिंग प्रकल्पाद्वारे सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते.
या पुरस्काराबद्दल उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मुख्याधिकारी अभिजीत बापट आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, पालिकेचे सर्व कर्मचारी आणि सातारकर नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले, हा पुरस्कार सातारा पालिकेच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीचे फळ आहे. सर्वांनी मनावर घेतल्यानेच आपण इथपर्यंत मजल मारू शकलो असल्याचे त्यांनी सांगितले.