maharashtra

सातारा नगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची कोटी उड्डाणे

28 फेब्रुवारी रोजी होणार अर्थसंकल्पीय प्रशासकीय सभा

सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय प्रशासकीय सभा 28 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता येथील कमिटी हॉलमध्ये होणार आहे. प्रशासक अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेमध्ये सातारा शहराचे बजेट 400 कोटीचा आकडा ओलांडून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सातारा : सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय प्रशासकीय सभा 28 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता येथील कमिटी हॉलमध्ये होणार आहे. प्रशासक अभिजीत बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेमध्ये सातारा शहराचे बजेट 400 कोटीचा आकडा ओलांडून जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शहराच्या विकासाची कोटी उड्डाणे अनेक विकास कामांमुळेच झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशासक अभिजीत बापट यांच्या कार्यकाळाला 14 महिने पूर्ण होत असून नगरसेवकांच्या मुदती संपून अद्याप निवडणुकीअभावी नवीन सर्वसाधारण सभा अस्तित्वात न आल्याने यंदाचे दुसरे बजेटही अभिजीत बापट यांच्या मार्फत मांडले जाणार आहे. अंदाजपत्रकाच्या अभिप्रायाचे कृती वाचन लेखापाल आरती नांगरे यांच्याकडून केले जाईल, अशी शक्यता आहे. गतवर्षीचे बजेट हे 212 कोटी रुपयांचे होते. मात्र यंदाचे मांडले जाणारे बजेट हे साधारण 400 कोटीच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज आहे. यासंदर्भातील लेखा विभाग आणि अंतर्गत लेखापरीक्षण यांच्या विभागीय बैठका सुरू असून अंदाजपत्रक मांडणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
प्रशासकीय कार्यकाळात यावर्षी दुसरा अर्थसंकल्प सादर होणार असून याच्या विशेष सभेमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यांच्या तरतुदी मांडल्या जाणार आहेत. शहर आणि हद्दवाढीतील भागाच्या विकासासाठी भरून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून कोट्यवधीचा निधी आणला जाणार आहे. या कोट्यवधी निधीची 10% लोकवर्गणी आणि त्या अनुषंगाने सुचविण्यात आलेली कामे तसेच अमृत योजनेअंतर्गत समाविष्ट कामे नगरोत्थान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत मंजूर होणारी कामे यामुळे सातारा शहराच्या विकासाचे बजेट चारशे कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. काही प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. कास बंदिस्त पाईपलाईन, हद्दवाढ भागातील विकास कामे, अमृत योजना, नगरोत्थान अशा विविध योजनांमधील शहरातील मोठी विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षीची अर्थसंकल्पीय सभा ही विशेष चर्चेची ठरली आहे. विकास कामांचे बजेट वाढल्यामुळे नक्की कोणकोणत्या विकासकामांवर कशी तरतूद केली जात आहे, या विषयावर विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे.