कराड लोकन्यायालयात तब्बल साडेपाच कोटीच्या तडजोडी
सामंजस्याने वाद मिटवण्यावर लोकांचा भर : ५२३ फौजदारी प्रकरणे निकालात
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कराड जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात विविध प्रकारचे तब्बल २ हजार १६१ न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये सुमारे ५ कोटी ५१ लाख २ हजार ४४५ रुपयांचे न्यायालयीन वाद तडजोडीने मिटवण्यात यश आले.
कराड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कराड जिल्हा सत्र न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात विविध प्रकारचे तब्बल २ हजार १६१ न्यायालयीन प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यामध्ये सुमारे ५ कोटी ५१ लाख २ हजार ४४५ रुपयांचे न्यायालयीन वाद तडजोडीने मिटवण्यात यश आले.
कराड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व्ही.व्ही. कठारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या लोकन्यायालयात पक्षकार व वकिलांनी सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी भर दिल्यामुळे न्यायालयात प्रलंबित असणारे अनेक वाद व न्यायालयात दाखल पूर्व वाद सुसंवादात मिटविण्यात यश आले. यामध्ये बँकेचे वसुली दावे, फौजदारी तडजोड पात्र गुन्हे, जमीन अधिग्रहण वाद, मोटार अपघात प्रकरणे, कौटुंबिक कलह, चलनक्षम दस्तऐवज, कायदा प्रकरणे, इतर दिवानी वाद आणि इतर किरकोळ प्रकरणे यांचा समावेश आहे. तसेच ७ मार्च ते ११ मार्च या कालावधीत न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे ५२३ फौजदारी प्रकरणे निकालात काढण्यात आली.
कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करत सदरील लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीशांनी व वकिलांनी दोन्ही बाजूकडील पक्षकारांमध्ये शांततामय मार्गाने व दोघांचेही समाधान होण्याच्या दृष्टीने सुसंवाद घडवून आणला. त्यामुळे कोणाचा विजय; कोणाचा पराभव अशी कोणतीही भावना न राहता दोन्ही बाजूकडील पक्षकार आनंदाने न्यायालयातील वाद तडजोडीने मिटवून आपापल्या घरी परतले. जय-पराजयाची भावना नसल्यामुळे पक्षकारांच्या चेहर्यावर एक विशिष्ट प्रकारचे समाधान होते.
जिल्हा न्यायाधीश व्ही.व्ही. कठारे, कराड वकील संघटनेचे अध्यक्ष विद्याराणी साळुंखे यांच्यासह सर्व न्यायाधीश वर्ग, वकील वर्ग व कर्मचारी वृंद यांनी लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगदान दिले.


