खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला.
फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्ते जलमय झाले होत.े
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मोळ (ता. खटाव) व डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून, रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला आहे.
गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.