साताऱ्यातील वैद्यकीय व्यावसायिकाचे ठोसेघर परिसरात अतिक्रमण माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांचा उपोषणाचा इशारा सातारा : सातारा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विकास घाडगे यांनी व्याघ्र प्रकल्पातील संवेदनशील ठोसेघर परिसरात दोन हेक्टर जागेवर बेकायदेशीररित्या बंगल्याचे बांधकाम केले आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. हे बांधकाम तातडीने जमीनदोस्त करावे, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सोमनाथ बळवंत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे पवार पुढे म्हणाले, ठोसेघर गट नंबर 183 येथे डॉक्टर विकास घाडगे व मेघा गाडगे यांनी सदर जागेत बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे. ग्रामपंचायत ठोसेघर यांनी कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी दिलेली नाही. याबाबत मंडल अधिकारी व ग्रामसेवक यांनी तसा अहवाल दिलेला आहे ग्रामपंचायत मध्ये मालमत्ता क्रमांक 412 अन्वये या मालमत्तेची नोंद झालेली आहे, मात्र ती चुकीची आहे. ठोसेघर परिसर हा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन असून येथे कोणतेही बांधकाम करता येत नाही. आमची तक्रार तहसीलदाराकडे दाखल झाल्यानंतर डॉक्टर घाडगे यांनी सदर बांधकामास परवानगी मिळावी म्हणून पत्राद्वारे परवानगी मागितली आहे. सदर बांधकामावर व बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर येत्या 10 दिवसात योग्य ती कारवाई झाली नाही तर दिनांक 12 डिसेंबर पासून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सोमनाथ पवार यांनी दिलेला आहे. ठोसेघर परिसर संवेदनशील क्षेत्र असताना तेथे घाडगे यांच्या बांधकामाबरोबर अनेक बांधकामे बेकायदेशीररित्या सुरू आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती गोळा करून त्या विरोधातही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.