रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारतात आले असून, दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, या साऱ्यात चर्चा सुरुय विमानाची...
जवळपास 4 वर्षांनंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान भारतासह रशियाचे अनेक करार होणार असून, पुतिन आणि मोदी यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर धोरणात्मक चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं अमेरिकेसह इतर बड्या देशांचंही लक्ष या भेटीकडे लागलं आहे. दरम्यान पुतिन भारतात आले, त्या क्षणी कडोकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात स्वागत केलं.
खास विमान अन् ते खास शब्द... अर्थ काय?
पुतिन यांच्या विमानावरील हा शब्द Code Name तर नाही? असाही प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. पण, तसं नाहीय. ज्या विमानानं रशियाचे राष्ट्रपती भारतात आले त्या विमानाचं नाव आहे इल्यूशिन-96 (IL96) आणि त्यावर लिहिण्यात आलेल्या россия चा अर्थ काय आहे माहितीये? हा एक रशियन शब्द असून, त्याचा अर्थ आहे 'रशिया'. तो सिरिलिक (Cyrillic) लिपीमध्ये लिहिण्यात आला आहे. ही लिपी प्रामुख्यानं पूर्व युरोप, मध्य आशिया इथं वापरली जाते. यामध्ये रशिया, बल्गेरिया, सर्बिया आणि युक्रेनचा समावेश आहे.
ग्रीक वर्णमाला ही या लिपीचं मूळ असून, 9 व्या शतकामध्ये संत सिरिल आणि मेथोडियस यांच्या अनुयायांनी या लिपीचा विकास केला. जवळपास 50 देशांमध्ये या लिपीचा वापर केला जात असून, तिला अज्बुका असंही म्हटलं जातं. 9 व्या शतकात प्रारंभिक बल्गेरियाई साम्राज्यात या लिपीचा विकास झाला, जी प्रामुख्यानं स्लाव्ह भाषांसाठी तयार करण्यात आली होती. या लिपीचा वापर बल्गेरियायी, सर्बियायी, मॅसेडोनियायी, उज्बेक, कजाख आणि मंगोलियायी भाषांसाठी केला जातो. 24 मे हा दिवस या वर्णमालेसाठी अतिशय खास असून, तो सिरिलिक वर्णमाला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मुख्यत्वे बल्गेरियातील संस्कृती आणि शिक्षणाला समर्पिक आहे. युपोपीय संघात अधिकृत मान्यताप्राप्त लिपीमध्ये या लिपीचाही समावेश होतो.


