लवकरच मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'पावनखिंड' (Pavankhinda) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत आहे. ऐतिहासिक सिनेमांवर मराठी प्रेक्षकांचे विशेष प्रेम आहे. पावनखिंड सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे ऐतिहासिक सिनेमांवर आणि मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शिवराज अष्टक ही फिल्म सीरिज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ मालिकांची सीरिज आहे. यातले 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' हे सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. लवकरच 'शेर शिवराज' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
शेर शिवराज (Sher Shivraj) : लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा 'शेर शिवराज' (Sher Shivraj) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेक मराठी कलाकारदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. नवीन चंद्रा, नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाचे एक पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला हात दिसतो आहे. सिनेमात कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao) : सरसेनापती हंबीरराव (sarsenapati hambirrao) हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून त्यांनीच या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सतराशे एक पन्हाळा (Satrashe Ek Panhala) : 'सतराशे एक पन्हाळा' हा ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. या सिनेमात अभिनेता सुशांत शेलार मुख्य भूमिकेत आहे. 'सतराशे एक पन्हाळा' या सिनेमाची निर्मिती स्वप्नील गोगावले करत आहे.