सावधान..! काळोशी येथील तलाव बनलाय धोकादायक

सांडव्या शेजारील भिंतीचा मातीचा भराव ढासळतोय; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकदा पाऊस सुरू झाला तो कधी थांबेल याचा अंदाज लावता येत नाही. कधी-कधी तर गावांचा कित्येक दिवस संपर्क ही तुटतो. यावर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी परळी खोर्‍यात जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे काळोशी येथील तलाव हा धोकादायक स्थितीत आला आहे. या तलावाच्या सांडव्याशेजारील भिंतीचा मातीचा भराव दिवसेंदिवस ढासळत असल्याने तलावा शेजारील घरांमधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनवडी : परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एकदा पाऊस सुरू झाला तो कधी थांबेल याचा अंदाज लावता येत नाही. कधी-कधी तर गावांचा कित्येक दिवस संपर्क ही तुटतो. यावर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असले तरी परळी खोर्‍यात जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे काळोशी येथील तलाव हा धोकादायक स्थितीत आला आहे. या तलावाच्या सांडव्याशेजारील भिंतीचा मातीचा भराव दिवसेंदिवस ढासळत असल्याने तलावा शेजारील घरांमधील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काळोशी येथील या तलावाचे सुमारे वीस ते तीस वर्षांपूर्वीचे बांधकाम आहे. या तलावात सुमारे 0.75 टीएमसी पाणीसाठा होतो. परंतु, पावसाच्या जोरदार मार्‍याने हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तसेच शेजारील भिंतीचा मातीचा भराव ढासळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सदर माहिती तहसीलदार, तलाठी यांना कळविली असून, पाठ बंधारा विभागामध्ये चौकशी केली असता या तलावाची कोणतीही नोंद नसल्याचे निदर्शनास आले, असे ग्रामस्थांनी सांगितले.       
सदर तलाव जर फुटला तर 20 घरांना धोका होऊ शकतो तसेच आंबवडे गावापर्यंत ओढ्याच्या बाजूला असणारे तीन किलोमीटरपर्यंत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच आंबवडे गावातील ओढ्याच्या बाजूला असणार्‍या घरांना अंदाजे पन्नास घर व लावघर तसेच पाटेकर या गावांना जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील पुलाला धोका होऊ शकतो. तरी संबंधित प्रशासनाने काळोशी येथील तलावाची तिवरे धरणासारखी परिस्थिती होण्याची वाट न पाहता तत्काळ उपाययोजना करून ग्रामस्थांच्या डोक्यावरील टांगती तलवार हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.