विसावा नाक्यावरील खड्डा देतोय अपघातास निमंत्रण

संबंधित विभागाने खड्डा मुजवण्याची वाहनचालकांची मागणी

पोवई नाक्याकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे जाताना अध्यक्षांच्या बंगल्या समोरील विसावा नाक्यावरील चौकात मुख्य रस्त्यावर मधेच पडलेला खड्डा वाहनचालकांच्या विशेषतः  दुचाकीस्वारांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे पोवई  नाक्याकडून  उतारावरून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने या खड्ड्यात आपटून किंवा खड्डा चुकविण्याच्या नादात गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सातारा : पोवई नाक्याकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे जाताना अध्यक्षांच्या बंगल्या समोरील विसावा नाक्यावरील चौकात मुख्य रस्त्यावर मधेच पडलेला खड्डा वाहनचालकांच्या विशेषतः  दुचाकीस्वारांच्या निदर्शनास येत नसल्यामुळे पोवई  नाक्याकडून  उतारावरून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने या खड्ड्यात आपटून किंवा खड्डा चुकविण्याच्या नादात गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विसावा नाक्यावरील अपघातास निमंत्रण देणारा हा खड्डा संबंधित विभागाने त्वरित बुजवण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक यादरम्यानच्या दुतर्फा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नगरपालिकेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात आले होते. त्यावेळी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा खड्डा दिसून येत नव्हता. परंतु, जून-जुलै महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर अध्यक्षांच्या बंगल्यासमोर विसावा नाक्याच्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचे पाणी सोडण्याचे दोन व्हॉल्व्ह आहेत, त्याच्या शेजारीच पोवई नाक्याकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर मधेच मोठा खड्डा पडलेला आहे. यावरून मार्च महिन्यात सदरच्या रस्त्याच्या केलेल्या कामाचा दर्जा या परिसरातील नागरिकांना आणि वाहनचालकांना पाहावयास मिळत आहे.
या रस्त्यावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. वाहतुकीचा प्रचंड ताण असलेल्या रस्त्यावरून पोवई नाक्याकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहने उतारावरून वेगाने येत असतात.  अशा वेळी विसावा नाक्यावर अध्यक्षांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या मधोमध असलेला हा खड्डा वेगाने येणार्‍या वाहनचालकांना खड्ड्याच्या अगदी नजीक आल्याशिवाय तो दिसून येत नाही. 
त्यामुळे बेसावध असलेल्या वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना अचानक दृष्टीत पडलेल्या या खड्ड्यातून आपले वाहन नेण्याशिवाय किंवा सदरचा खड्डा चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.  अशावेळी अचानक दृष्टीत पडलेला खड्डा किंवा खड्ड्यात चुकवण्यासाठी केलेली तारेवरची कसरत यामुळे वाहनचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटून गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, या खड्ड्या शेजारीच मुख्य रस्त्यावरील दुभाजक आहे. त्यामुळे सदर खड्ड्यात आपटलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटून सदरचे वाहन या दुभाजकावर आपटण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
तरी सातारा नगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी विसावा नाक्यावरील अध्यक्षांच्या बंगल्यासमोरील सदरचा धोकादायक व अपघातास निमंत्रण देणारा सदरचा खड्डा त्वरित मुजवण्याची मागणी वाहनचालकांनी व या भागातील जागृत नागरिकांनी दै.‘मुक्तागिरी’शी बोलताना केली.