धक्कादायक बातमी : डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुक ठरावानंतर माण तालुक्यातील गंभीर घटना
By esahas.com web team Sun 28th Feb 2021 03:55 am
म्हसवड : अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील पानवन येथे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संबंधित डॉक्टरांचा ठराव झाल्यानंतर घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ता. माण) असे अपहरण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर डॉ. शिंदे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञात इसमांनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्या गाडीत गाडीची जाळपोळ केली आहे. ठरावा नंतर ही घटना घडल्यामुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक निलेश सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.