पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘सिव्हिल’मध्ये कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

रोज 380 जणांच्या नमुन्यांची होणार तपासणी  

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी  दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी  दिली होती. यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब असावी, अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन झाले. 
रविवारी (दि. 9) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कराडमध्ये आजपासून लॅब कार्यान्वित होईल, असे सांगितले होते. या लॅबममधून रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून,  यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासांच्या आत मिळणार असून, रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.