cineworld

लसीकरणासाठी महाबळेश्‍वर, पाचगणी पालिकांना आर्थिक करू

ना. एकनाथ शिंदे यांचे आश्‍वासन ः स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

महाबळेश्‍वर, ः केंद्र शासनाकडून लसींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नाही अशा वेळी लसीकरणासाठी शासनावर अवलंबून न राहता राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्‍वर पांचगणी पालिकांनी जर पुढाकार घेतला तर काही प्रमाणात नगरविकास विभागाच्या वतीने पालिकांना आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी दिले. 
लसीकरणबाबत निर्णय घेण्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल ड्मिलॅण्डच्या सभागृहात तालुक्यातील अधिकारी विविध संघटना लोकप्रतिनिधी व नागरीकांची एक महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ना. एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी आ. महेश शिंदे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व विविध खात्यांचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीत ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनामुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे. कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. आता काही दिवसांनी तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचेही तज्ञांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी नागरीकांचे 100 टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. महाबळेश्‍वर व पांचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे आहेत. पर्यटनावरच येथील स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यापेक्षा अधिक काळ ही पर्यटन स्थळे बंद राहणे हे येथील लोकांच्या दृष्टीने योग्य नाही. ही पर्यटनस्थळे शक्य तितक्या लवकर उघडली पाहिजे, याबाबत कोणाचे दुमत नाही. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा नागरीकांचे संपुर्ण लसीकरण होईल. यासाठी आता आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्‍वर, पांचगणी नगरपालिका व पंचायत समितीने याबाबत जर पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला तर काही प्रमाणात आपण लस खरेदी करण्यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने लागणारी आर्थिक तरतुद करण्यात येईल. आता शहरातील विविध संस्था दानशुर व्यक्ती यांनी देखील आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही ना. एकनाथ शिंदे यांनी केले. 
राज्यातील बांधकाम परवानगीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. दिड हजार स्क्वेअर फुट घर बांधण्यासाठी आता कोणाच्या परवानगीची गरज नाही. तीन हजार फुटांपर्यंत दहा दिवसात परवानगी देण्याची सक्ती संबंधित विभागांना करण्यात आली आहे. जर दहा दिवसात परवानगी दिली नाही तर डिम परवानगीची तरतुद करण्यात आली आहे, असे अनेक चांगले निर्णय आपण घेतले आहेत. नियम व कायदे हे लोकांसाठी आहे. परंतु त्याचा लोकांना फायदा झाला तरच नियमांचा उपयोग नाही कायदे केवळ पेपरवर असुन उपयोग नाही. नगरविकास विभागाकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले निर्णय आम्ही घेतले आहेत.
या बैठकीला जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कदम माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी असिफ सयद तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे आणि त्या साठी आ मकरंद पाटील हे पुढाकर घेत असल्या बद्द्ल ना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आ मकरंद पाटील करीत असलेल्या प्रयत्नाला नागरीकांनी देखिल सहकार्य करून योगदान दयावे असे आवाहन ही ना एकनाथ शिंदे यांनी केले 
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आ मकरंद पाटील हे झटत असताना शहराचे प्रथम नागरीक असेलेल्या नगराध्यक्षांनी या बैठकीला दांडी मारली त्या मुळे ना एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या बरोबर चर्चा केली तेव्हा त्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्या भुमिका एकटयाच पार पाडत असल्यची चर्चा या बैठकीत उपस्थित असेलेल्या नागरीकांतुन सुरू झाली होती.