खेड्या-पाड्यात दिसणारे वासुदेव आता दिसेना...
कोरोनाच्या पाठोपाठ ओमिक्रॉनचे वासुदेवांवर संकट.. ..!
‘वासुदेव आला हो... वासुदेव आला..., सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो..., वासुदेव आला... हे गाणं ऐकले की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभे राहते.
पुसेगाव : ‘वासुदेव आला हो... वासुदेव आला..., सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो..., वासुदेव आला... हे गाणं ऐकले की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभे राहते. वासुदेव म्हणजे अंगभरून पोशाख, हातात टाळ - चिपळ्या, डोक्यात विविधरंगी कवड्यांच्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप, कपाळी गंध, गळ्यात विविध देवतांच्या माळा, कंबरेला बासरी असे हवेहवेसे वाटणारे देखणे रूप. ऐटदार पेहरावातील या वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणत, दान मागत फिरतांना पाहणं हा मन प्रसन्न करणारा अनुभव असतो.
पूर्वी खेड्यांमध्ये दारात आलेल्या वासुदेवाला मानमरातब मिळायचा. लोक हातातले काम सोडून घटकाभर थबकायचे. त्याला दान द्यायचे. वासुदेवाला दान देतांना घरच्या लक्ष्मीचा हात कधी आखडत नसे. गावातून तृप्त होऊन वासुदेव परतायचा. काळानुरूप होत गेलेल्या बदलांमुळे वासुदेव हळूहळू लुप्त होत चालला आहे. तसेच गतदोन वर्षापासुन देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला. तो कमी होत नाही तर ओमीक्रॉनने डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातील घराचीही दारे बंद राहत आहेत. तर निमशहरांमधील वसाहती, सोसायटी मधील काप्पेबंद वातावरणामुळे वासुदेवाला या ठिकाणी प्रवेशच मिळत नाही. घराचे बंद दरवाजे आणि लोकांचे उशिरा उठणे वासुदेवाला अगतिक बनवते. दान मिळणे तर दूरच! पण ही लोककला पहायला, ऐकायला कोणीही नाही, हे वासुदेवासाठी वेदनादायी आहे. वासुदेवाच्या भावी पिढीला पहाटे उठून अंगभर पोशाख चढवून गाणे म्हणणे मान्य नसल्याने ही मुले वासुदेव न होता शिक्षण घेऊन व्यवसाय अथवा नोकरी करणे पसंत करीत आहेत’ असे. देविदास यदमाळ रा. खासगाव (ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी सांगितले. खासगाव येथील दिडशे-दोनशे घरात परंपरागत वासुदेवाचा वारसा पिढीजात सुरू आहे. मात्र येथील वासुदेव समाजातील बहुतांश कुटुंबे उदरनिर्वाहासाठी औरंगाबाद, पुणे, सातारा, नाशिक, नगर अशा ठिकाणी भटकंती करीत आहेत. बदलत्या काळात हा समाज विकासापासून दूर फेकला गेला. केंद्रात ओबीसी, राज्यात एनटी ‘ब’ प्रवर्गात समावेश केल्याने शासकीय योजना या समाजापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे उपासमारीची वेळ या समाजावर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत गरज आहे जागरुक नागरिक, अधिकार्यांनी यांच्यासाठी असलेल्या या योजना यांच्यापर्यंत पोहोचविण्याची. तर आणि तरच हा समाज नामशेष न होता समाजाचाच एक घटक होवून राहू शकतो.
मला दोन मुले, एक मुलगी आहे. गल्लोगल्ली फिरणे मान्य नसल्यामुळे मुलं वासुदेवाचा वारसा जपण्यास तयार नाहीत. ती शिक्षण घेत आहेत. अल्पसंख्याका पेक्षाही वासुदेव समाज अत्यल्प असल्याने सरकारने शैक्षणिक आरक्षण द्यावे... म्हणजे आमच्या मुलांवर. भटकंती करीत दान मागण्याची वेळ येणार नाही.
- देवीदास यदमाळ, वासुदेव.


