deshvidesh

माणमधील 16 गावातील शेतीसाठी टेंभूचे पाणी येईपर्यंत लढा सुरूच

कोरेवाडी येथे पाणी पूजनप्रसंगी अनिल देसाई यांचा दृढनिश्‍चय

टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. - अनिल देसाई, (संचालक , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक)

म्हसवड : टेंभूचं पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवनदायिनी ठरणारं आहे. टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असा दृढनिश्चय सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी व्यक्त केला.

कोरेवाडी (ता. माण) येथे आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बापूराव नलवडे, विरळीचे सरपंच प्रशांत गोरड, भारत अनुसे, तानाजी बनगर, बापूराव बनगर, काळचौंडीचे उपसरपंच आबा कोरे, बाबाराजे हुलगे, अनिकेत आटपाडकर, गणेश माने, हर्षद माने, किसन माने, किसन घुटूकडे, राजू गोरड, विष्णू जमाले, भागवत पिसे, शहाजी ढेरे, साहेबराव खरात आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनिल देसाई म्हणाले, नेतृत्वाची द्यायची दानत असेल तर पाणी मिळतच याचं हे उत्तम उदाहरण आहे. हे श्रेय माझ्या एकट्याचं नसून आपण सर्वांनी मला साथ दिल्यामुळेच आपल्याला हे पाणी मिळाले आहे. ही पाण्याची योजना आपल्याला कायमस्वरुपी चालू ठेवायची आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत कधीच ही योजना बंद पडू देणार नाही. आपला पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आपल्या शेतीसाठी जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही.

भारत अनुसे म्हणाले, आमचं वर्षानुवर्षांचं स्वप्न सत्यात उतरविण्याचं काम या योजनेमुळे झाले आहे. अनिल देसाई यांनी मोठ्या कौशल्याने आणलेलं पाणी हे, या भागात कधीच पाणी येणार नाही असं म्हणणार्यांना मोठी चपराक आहे. या पाण्याने हा सर्व परिसराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

बापूराव बनगर म्हणाले, अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली 2003 सालापासून टेंभू योजनेसाठी आम्ही जो संघर्ष केला त्याचे हे यश आहे. या पाण्यामुळे आमचा पाण्यासाठीची वणवण थांबली असून हा भाग टँकरमुक्त झाला आहे.