महाबळेश्वर ः हिलदारीच्या मदतीने देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना व नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिलदारी व गिरिस्थान नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हिरडा विश्राम गृहावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात ते बोलत होते. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विनय गौड, प्रांताधिकारी संगिता राजापुरकर, तहसिलदार रणजितसिंह भोसले, पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पंचायत समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष अफजल सुतार हे उपस्थित होते.
महाबळेश्वरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु, मानवनिर्मित कचर्यामुळे सुंदर पर्यटन स्थळाची प्रतिमा मलिन होते. ही प्रतिमा सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षे हिलदारी संस्था येथे घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहणार आहे. देशातील अनेक हिलस्टेशनवर या संस्थेने काम केले आहे. पांचगणीपेक्षा महाबळेश्वर येथील स्वच्छतेची स्थिती अधिक खराब आहे, म्हणून येथे काम करण्याची गरज आहे. आपण कचरा व त्याची विल्हेवाट यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करतो तरी आपल्या स्थितीत सुधारण होत नाही. आजही कचरा डेपोवर कचर्याचे डांगर उभे आहेत. कोकणातील वेंगुर्ले येथील कचरा डेपोवर बगिचा फुलविला आहे. अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे हिलदारी या संस्थेला नागरीकांचे सहकार्य मिळाले तरच महाबळेश्वर हे सुंदर व स्वच्छ शहर म्हणुन उदयास येईल या साठी शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना लोकप्रतिनिधी नागरिक यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. यापुर्वी आपण ओला आणि सुका असे दोन प्रकारचे वर्गीकरण करत होतो. आता चार प्रकारात वर्गीकरण करावे लागणार आहे. जो असे वर्गीकरण करणार नाही. अशा संस्था व कुटूंबांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतुद पालिकेने नियमावलीत करावी. केवळ आपले शहर स्वच्छ करून आपली प्रतिमा सुधारणार नाही तर महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहराजवळ असलेली लहान लहान गावेदेखील स्वच्छ झाली पाहिजे.
त्याचप्रमाणे पॉइंर्टकडे जाणारे रस्ते राईड्स देखील स्वच्छ हवेत. यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता आहे. पालिकेने जवळच्या खेडयातील कचरा कसा गोळा करायचा त्या बाबत निर्णय घ्यावा, महाबळेश्वर सुंदर आणि स्वच्छ म्हणून नावारूपास येण्यासाठी पालिका महसूल व वन यांची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या तीनही विभागात समन्वय आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरीचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी फुलझाड देवून जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्यासह इतर मान्यवरांचे स्वागत केले. हिलदारी ही संस्था पुढील तीन वर्षे कशा प्रकारे काम करणार आहे. याबाबत हिलदारीचे प्रकल्प अधिकारी डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी बाळासाहेब भिलारे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी, असिफ सयद तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.