maharashtra

पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरा

अग्निकाष्ठ सरण समितीचे आवाहन : वृक्षतोडीस आळा, स्वच्छ सर्वेक्षणासही हातभार, नगरपालिकेचे सहकार्य

Use ‘Agnikasht’ firewood for dead body burning
मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्‍हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

कराड : मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्‍हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मानवी जीवनाचा अंत झाल्यानंतर त्याच्या देहाच्या क्रियाकर्माबाबत वेगवेगळ्या धर्मांच्या परंपरेप्रमाणे विविध प्रथा आहेत. आपल्या देशात मृतदेहाच्या दहनाची प्रथा मोठ्या प्रमाणात असून एका मानवी पार्थिवाच्या दहनासाठी दोन पूर्ण वाढ झालेले वृक्ष तोडावे लागतात. म्हणजे आपल्या कोट्यावधी लोकसंख्येच्या देशात रोजचे लाखो मृत्यु होत असतील; तर तेवढ्या प्रमाणात वृक्षतोड होत जाणार आहे. या गतीने पुढच्या पिढीला आपल्याकडे दाखवायला जंगल शिल्लक रहाणार नाही. तसेच वृक्षांवर अवलंबून असलेल्या प्राणी, पक्षी व एकुण पर्यावरणाला धोकाच निर्माण होणार आहे. हा संभाव्य धोका ओळखून कराडमधील काही सजग लोकांनी कराड पालिकेच्या सहकार्याने दहन परंपरेसाठी एका वेगळ्या माध्यमाचा विचार केला आहे.
वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस अशा बायोवेस्टमधून "अग्निकाष्ठ" नावाचे सरपण उपलब्ध केले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार आहेच; पर्यायाने वृक्षतोड थांबणार आहे. व पर्यावरणाचा अधिक र्‍हास टळणार आहे. हे सरण प्रति किलो १० रुपये दराने उपलब्ध होणार असून एका मृत व्यक्तिस १५० ते २०० किलो सरण लागते. यासाठी १ लिटर रॉकेल किंवा डिझेल लागते. बाकी खोबरे, तुप, कापुर सारख्या अन्य वस्तू लागत नाहीत. एका दहनाचा खर्च जास्तीत जास्त २ हजार रुपये होईल. हे सरण नगरपालिकेच्या सहकार्याने स्मशानभुमीत उपलब्ध करण्यात येणार असून पश्चिम महाराष्र्टात प्रथमच ही सुविधा उपलब्ध होत आहे.
‘अग्निकाष्ठ’ सरणामुळे होणार्‍या वृक्षतोडीस आळा बसून पर्यावरण रक्षणाचेच कार्य होणार आहे. तसेच ‘वसुंधरा बचाव’ योजनेस चालना मिळून कराड नगरपालिका व पर्यायाने समस्त कराडकर नागरिकांचा सन्मान होणार आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण समितीने सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नागपूर सारख्या शहरात त्याचा नियमित वापरही होत आहे. जे काळाप्रमाणे बदलते; ते काळासमोर टिकते. जे बदलत नाही; ते काळाच्या प्रवाहात वाहून जाते. आपल्यालाही पार्थिव शरीराच्या दहन परंपरेत काळाप्रमाणे काही बदल करावे लागणार आहेत. या बदलासाठी तयार करण्यात आलेले ‘अग्निकाष्ठ’ हे अतिशय उपयुक्त असून त्याची उपलब्धता, किंमत, ज्वलनशीलता व त्याच्या तापमानाचा निर्देशांक या सर्व कसोटींवर ते उत्तमरीत्या उतरले आहे. हे सरपण अत्यंत कमी खर्चात उपलब्ध होणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या शहराला सातत्याने प्राप्त झालेले मानांकन या उपक्रमामुळे अधिक गौरवास्पद ठरणार आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही समस्त कराडकरांना अवाहन करतो की; आपण आपले आप्त स्वकीय, मित्र, शेजार पाजारी होत असलेल्या दहनासमयी या पद्धतीचा वापर करावा व आपल्या वसुंधरेच्या पर्यावरण संवर्धनाला सहकार्य करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहनही अग्निकाष्ठ सरण समितीच्या वतीने विनायक पावसकर, महेंद्रकुमार शाह, सुरेश पटेल, सुधीर एकांडे यांनी केले आहे.