पोलीस असल्याची बतावणी करून एका दाम्पत्याचे सुमारे 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून एका दाम्पत्याचे सुमारे 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी माधव गणपती ननवरे वय 75, रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव हे निवृत्त शिक्षक आपल्या पत्नीसमवेत वडूज येथे काही कामानिमित्त गेले होते. काम पूर्ण झाल्यावर ते पुन्हा सिद्धेश्वर कुरोली कडे येत असताना बारा वाजण्याच्या सुमारास नायकाची वाडी, तालुका खटाव गावच्या हद्दीत नायकाची वाडी फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने त्यांची गाडी अडवली. मी पोलीस असून आमचे जिल्ह्यात चेकिंग चालू आहे, जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे तुमच्याकडील दागिने माझ्याकडे द्या, मी ते रुमालात बांधून देतो, असे सांगितले. त्याच वेळेस आणखीन एक मोटर सायकलस्वार त्या ठिकाणी आला.
ननवरे यांनी त्यांच्या हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि त्यांच्या पत्नीने १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असा 68 हजार रुपये किंमतीचा ऐवज त्या व्यक्तीच्या हातातील रुमालात ठेवला. त्याने हातचलाखी करून तो ऐवज लांबवून पुन्हा रुमालाची गाठ मारली आणि तो रुमाल ननवरे यांना परत दिला. यानंतर ते दोघेही मोटर सायकलस्वार निघून गेले. यानंतर ननवरे दाम्पत्य सिद्धेश्वर कुरोली कडे येत असताना त्यांना संशय आल्याने त्यांनी रुमाल तपासला असता रुमालातील दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या संदर्भात वडूज पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. यानंतर अज्ञात दोन चोरट्यांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दीक्षित अधिक तपास करीत आहेत.