जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल : आमदार शशिकांत शिंदे
राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल, असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
पुसेगाव : राष्ट्रवादीने खटाव तालुक्यातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे करून विकासाचा सेतू बांधला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या भागात विकासाचा दीप कायम तेवत ठेवला आहे. राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांच्या बळावर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकेल, असा ठाम विश्वास सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
पुसेगाव (ता. खटाव) येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी उपसभापती संतोष साळुंखे, बाळासाहेब इंगळे, जितेंद्र शिंदे, सुरेशशेठ जाधव, संदीप जाधव, संजयनाना चव्हाण, राम जाधव, ज्ञानेश्वर जगताप, उदय कदम, जगनशेठ जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, सरपंच विजय मसणे, वसंतराव जाधव गुरुजी, पुसेगाव-खटाव-बुध गटातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना खटाव तालुक्याचा शाश्वत विकास साधण्यावर नेहमी भर दिला. या भागातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जलसंधारणाची प्रचंड कामे केली. यामुळे बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. वाड्यावस्त्यामध्ये कोट्यवधींची विकासकामे करून रस्त्यांचे जाळे निर्माण केल्यामुळे वाहतुकीची समस्या दूर झाली आहे.
प्रदीप विधाते म्हणाले, राष्ट्रवादीने विकास काय आणि कसा असतो हे खटाव तालुक्याला दाखवून दिले आहे. पक्षीय भेदभाव न करता लहानशा गावात देखील कोट्यवधींची कामे करून गावे स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी तालुक्याला अधिकचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे येथील विकासाचा आलेख कायम चढता राहण्यास मदत झाली आहे. माझ्या उपाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात देखील अधिकचा निधी आणि सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.