धमक्यांना कंटाळून गळफास घेतलेल्या शेतकरी युवक नवनाथ मारुती दडसच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवड आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघी कॉन्स्टेबल बहिणींसह त्याच्या आई- वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
सातारा : धमक्यांना कंटाळून गळफास घेतलेल्या शेतकरी युवक नवनाथ मारुती दडसच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवड आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघी कॉन्स्टेबल बहिणींसह त्याच्या आई- वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत युवकाची बहीण शांताबाई हिराचंद वलेकर (वय 35, रा. कोथळे, ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे.
शिल्पा नवनाथ दडस (कॉन्स्टेबल, म्हसवड पोलीस ठाणे), तिची बहीण अनिता लाला गाडेकर (कॉन्स्टेबल, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे) आणि त्यांचे वडील लाला नागू गाडेकर व आई सीताबाई लाला गाडेकर (सर्व रा. गाडेकरवस्ती, भाटकी, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, नवनाथ दडस हा कोथळे, ता. माळशिरस येथे शेती करत होता. तो त्याची पत्नी शिल्पासह म्हसवड पोलीस लाईनमध्ये राहण्यास असून ऑक्टोबर 2022 ते 25 फेब्रुवारी 2023 या कालावधीत म्हसवड आणि गाडेकरवस्ती भाटकी येथे संशयित चौघांनी नवनाथ यास वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांना कंटाळून नवनाथ याने नायलॉन रस्सीच्या सहाय्याने गळफास घेऊन 25 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप चौघांवर असून घटनास्थळी उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांनी भेट दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे अधिक तपास करत आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडालीये.
दरम्यान, गेल्या महिन्यात साताऱ्यातील व्यावसायिक पतीचा सुपारी देऊन खून केल्याप्रकरणी सातारा पोलीस दलातील हवालदार महिलेला अटक झाली होती. आता पतीस आत्महत्येप्रकरणी त्याच्या कॉन्स्टेबल पत्नीसह तिच्या कॉन्स्टेबल बहिणीवर गुन्हा दाखल झाल्याने सातारा पोलीस दलात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.