मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ट्विटर या सामाज माध्यमावर आयोजित केलेल्या ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल देशविदेशातील ९३७ श्रोत्यांच्या उपस्थितीत हे पहिलेवहिले साहित्य संमेलन रविवारी (दि१५ ऑक्टोबर) पार पडले.
वाई : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त ट्विटर या सामाज माध्यमावर आयोजित केलेल्या ट्विटर वाचन प्रेरणा साहित्य संमेलनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तब्बल देशविदेशातील ९३७ श्रोत्यांच्या उपस्थितीत हे पहिलेवहिले साहित्य संमेलन रविवारी (दि१५ ऑक्टोबर) पार पडले.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित आणि सचिव डॉ. देवरे यांच्या मान्यतेने वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले होते.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी डॉ.जगतानंद भटकर यांनी या संमेलनाचे संयोजन आणि संचालन केले. ट्विटर या सामाज माध्यमावर ट्विटरस्पेस असा उपयोजक उपलब्ध असतो. त्यावर जगभरातील लोक जुळून आपले म्हणणे ऐकू शकतात आणि मांडू शकतात. या उपयोजकावर हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाची सूचना ही ५० हजार वापरकर्त्यां पर्यत गेली होती. अमेरिका, कुवैत, दुबई, ऑस्ट्रेलिया या देशांतून आणि भारतातील काही राज्यातील मराठी लोक मिळून ९३७ लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या संमेलनातील सत्रे ध्वनिस्वरुपात ट्विटरवर उपलब्ध असून ते वाचक आणि श्रोते यांच्यासाठी खुले आहेत.
या संमेलनात महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषाविषयक चालू असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली, सोबतच मराठी विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया आणि त्याची समाजासाठीची उपयुक्तता यावरही विस्तृत चर्चा करण्यात आली. या संमेलनात एकूण चार सत्र झाले. डॉ. शंतनू अभ्यंकर वाई यांनी भाषा आणि भाषांतर शेखर जाधव, सिडनी ऑस्ट्रेलिया यांनी विदेशात वाचले जाणारे साहित्य, श्रीमती रश्मी मदनकर नागपूर यांनी आजची तरुण पिढी आणि वाचन तसेच प्रवीण कलंत्री यांनी समाज माध्यमावर साहित्याचा प्रसार या विषयावर आपले विचार मांडले. वाचन चळवळीत कार्य करणाऱ्या लेट्स रीड इंडिया आणि पुस्तकं आणि बरेच काही या संस्थांचे सदस्यही या संमेलनात उपस्थित होते.
शासनाकडून आयोजित केलेले समाजमाध्यमावरील हे पहिलेच साहित्य संमेलन होते. शासनाच्या मराठी भाषाविषयक कार्याची माहिती, वाचन आणि वाचनचळवळ याविषयीचे विचारमंथन देशविदेशातील लाखो मराठी लोकांसमोर या निमित्ताने घडून आले.