सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असूनही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पाणी अनेक प्रकारे सांगली जिल्ह्यात जात आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नेते पक्षीय मतभेद विसरून पाणी प्रश्नावर एकत्र येत असताना सातारा जिल्ह्यातील नेते एकत्र येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावे अद्यापही वंचित आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असूनही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पाणी अनेक प्रकारे सांगली जिल्ह्यात जात आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नेते पक्षीय मतभेद विसरून पाणी प्रश्नावर एकत्र येत असताना सातारा जिल्ह्यातील नेते एकत्र येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावे अद्यापही वंचित आहेत. यासाठी माण-खटावमधील पाण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभारणार असून याच महिन्याअखेरीस मोठी पाणी परिषद आयोजित करणार असल्याची माहिती माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिली.
खटाव-माण शेती पाणी लढा समन्वय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप येळगावकर यांची निवड झाली. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. येळगावकर बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, माण-खटावच्या पाणी प्रश्नावर एकत्र येण्यासाठी सर्वपक्षीयांना नेत्यांना या समितीत सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत. दुष्काळी गावांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्यासाठी शासनाने अतितुटीचे खोरे, तुटीचे खोरे, विपूल व अतिविपूल अशी वर्गवारी केली आहे. त्यानुसार अतितुटीच्या खोर्यांना अग्रक्रमाने पाणी देणे बंधनकारक आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील येरळा खोरे सर्वाधिक पात्र आहे. मात्र, पाणी वाटप करताना या खोर्यातील वंचित गावांवर पाण्याबाबत अन्याय होत आहे. ज्यावेळी सांगली जिल्ह्यातील नेते पक्षभेद विसरून पाणीप्रश्नी एकत्र येतात त्याचवेळी आपल्या जिल्ह्यात सातारा, कराड, फलटणचे नेते त्यांच्या तालुक्यात पाणी आल्याने ‘आपलं भागलं’ अशा अविर्भावात गरज नसल्यासारखे वागत आहेत. मात्र, ज्यावेळी जनतेतून पाण्यासाठी उठाव होईल, त्यावेळी त्यांना या पाणी लढ्यात सहभागी व्हावेच लागेल.
यावेळी डॉ. येळगावकर यांनी कृष्णा पाणी तंटा लवाद 2 यांची सर्वोच्च न्यायालयातल स्थगिती उठवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी प्रयत्न करणे. त्यातून 85 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला मिळवावा, सोळशी धरणाची आखणी करून निर्मितीसाठी पाठपुरावा करावा, उरमोडी धरणासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे स्वतंत्र कॅनॉल यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. देशात उरमोडी हे पहिलेच धरण असेल ज्याला स्वतःचा कॅनॉल नसल्याची टिका यावेळी त्यांनी केली.
जिहे कटापूर आठमाही करणे त्यातून माणची पूर्व आणि उत्तरमधील 48 गावे आणि खटावची सातेवाडी पेडगाव, एनकूळ, कणसेवाडीपर्यंत 16 गावे आणि नेर उत्तरेकडील डिस्कळ, मांजरवाडी परिसरातील वंचित गावे यांचा समावेश करण, औंध ब्रह्मपुरीसह वंचित 21 गावांचा समावेश करून ही पाणी योजना करण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभू योजनेबाबत डॉ. येळगावकर म्हणाले, टेंभू योजनेच्या प्रस्तावनेवर स्पष्ट उल्लेख आहे की, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील केवळ दुष्काळी गावांना याचे पाणी मिळावे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार टेंभू योजनेच्या 22 टीएमसी पैकी जिल्ह्याला जे तुटपुंजे पाणी मिळत होते ते कराड तालुक्यातील दोन गावांना. त्यानंतर योजनेच्या फेरवाटपामध्ये खटाव तालुक्यावर अन्याय झाला आहे. या योजनेचे किमान 5 टीएमसी पाणी जादा मिळावे, त्यामध्ये कलेढोण गारळेवाडीसह 16 गावे व माण तालुक्याच्या पूर्व भागातील 18 गावे यांचा समावेश पाणी योजनेत करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तारळी उपसा सिंचन योजना 5.84 टीएमसी असून 0.84 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी आहे. त्यासाठी बंदिस्त पाईपलाईन तारळी योजनेपासून आरफळ कॅनॉलपर्यंत झाली आहे. त्यामुळे तारळीचे पाणी खटाव-माणला देणार कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
खटाव-माणमध्ये तारळी टेंभू आणि उरमोडीचे पाणी सिंचनासाठी येत आहे. योजनेतील या सिंचन योजनेचे हक्काचे पाणी आणण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर शेतकर्यांकडून पैसे न घेता साखर कारखान्यांकडन प्रतिटन 50 रुपये आकारणी करण्याची व्यवस्था करणाचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत शेतकर्यांकडून विरोध होईल का असा प्रश्न उपस्थित केला असता तालुक्यात ऊस उभा असून वाळून चालला आहे. त्यामुळे कमी टन ऊस भरल्यास मोठा फटका शेतकर्यांना बसणार आहे. त्यातच या भागात प्रवाही पाणी नसून पाणी उचलून घ्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, खटाव-माण शेती पाणी लढा समन्वय समितीच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. येळगावकर यांच्यासह माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, डॉ. संदीप पोळ, धैर्यशील कदम, मामूशेठ विरकर, संजय भोसले, अनिल पवार, संजय भगत, अरविंद पिसे, हर्षद घुटुकडे, अंकुश दवडे, दत्तात्रय घार्गे, नितीन घार्गे-देशमुख, निलेश घार्गे-देशमुख, धनाजी घार्गे-देशमुख, सदाशिव खाडे, टी. आर. गारळे, आर. बी. देवकुळे, सचिन भिसे, आप्पासो निंबाळकर व रंगराव जाधव आदींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.


