गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही सातारा पोलिसांनी दाद दिली नाही. या कारणास्तव शुक्रवारी दुपारी सदर बाजार मधील लक्ष्मी प्रकाश डागा व प्रकाश डागा या दांम्पत्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सातारा : गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही सातारा पोलिसांनी दाद दिली नाही. या कारणास्तव शुक्रवारी दुपारी सदर बाजार मधील लक्ष्मी प्रकाश डागा व प्रकाश डागा या दांम्पत्याने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा शहरातील सदर बाजार मध्ये लक्ष्मी डागा या पती प्रकाश डागा व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहेत. रविवार पेठेतील जुनी भाजी मंडईत राहणारा साहिल कोलकर, सलीम कोलकर, क्षमाप्पा कोलकर हे प्रकाश डागा व त्यांच्या कुटुंबीयांकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागत होते. त्यानी नकार दिल्यानंतर गुटखा विक्री करा, तुम्हाला जास्तीचे पैसे देतो, असे म्हणत त्या तिघांनी प्रकाश डागा यांच्यावर दबाव टाकला. या खंडणीच्या कारणावरून डागा व इतरांना मारहाणही झाली होती. कराड, सांगली येथील गुंडाकडून संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकी देण्यात आल्याची लक्ष्मी डागा यांची तक्रार आहे. याबाबतचा तक्रार अर्ज लक्ष्मी डागा यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केला होता. अर्ज करून सुद्धा पोलिसांनी दखल न घेतल्याने लक्ष्मी डागा व प्रकाश डागा यांनी शुक्रवारी सकाळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी इशारा दिला गेल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्यांना ठेवला होता. डागा दांपत्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ज्वलनशील पदार्थ ओढून घेत असताना त्या दोघांना ताब्यात घेतले आणि अंगावर पाण्याचा मारा केला.
यानंतर दोघांना तपासणीसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.