एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर रोटर फिरवून भाजपशी घरोबा केल्यानंतर उणेपुरे पंधरा दिवस उलटतात न उलटतात तोच जिल्हा राष्ट्रवादीतील कद्दावर नेते समजले जाणार्या सभापतींनी आज कोरेगाव उत्तर मध्ये कार्यकर्त्यांचा सिक्रेट मेळावा घेवून भाजपात जावून आपले पद वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.
सातारा : एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर रोटर फिरवून भाजपशी घरोबा केल्यानंतर उणेपुरे पंधरा दिवस उलटतात न उलटतात तोच जिल्हा राष्ट्रवादीतील कद्दावर नेते समजले जाणार्या सभापतींनी आज कोरेगाव उत्तर मध्ये कार्यकर्त्यांचा सिक्रेट मेळावा घेवून भाजपात जावून आपले पद वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. फलटणमध्ये यासंदर्भात निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून या मेळाव्यातच सर सलामत तो पगडी पचास, असे म्हणत सभापती भाजपात नांगर टाकणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकारला बेसावधपणे खिंडीत पकडून एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या अंधारात अस्मान दाखवले. शिस्तीत वाढलेला पक्ष, अशी ओळख असणार्या शिवसेनेलाच मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दावणीला बांधले. हा धक्का महाविकास आघाडीतील घटक पक्ष पचवित असतानाच फलटण तालुक्यातील सभापतींनी मात्र विधानपरिषदेच्या विजयाची हळद उतरण्याच्या आतच राष्ट्रवादीशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसातच ते भाजपात प्रवेश करुन आपले पद शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते, माजी खासदार लक्ष्मणराव पाटलांनी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांच्याशी निष्ठा राखत आपले संपूर्ण आयुष्य जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी वेचले. त्यांच्या पश्चात फलटणच्या सभापतींनी नेतेपदाच्या मुंडावळ्या स्वत:हूनच बांधल्या. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत सभापती महोदय उपरे झाले. परंतू शरद पवारांनीही निष्ठेची आणि मैत्रीची बूज राखत सभापती महोदयांना विधान परिषदेवर निवडून आणून त्यांचे पुनर्वसन केले. सभापतीपदाच्या मुकूटासह गेली 22 वर्षे ते सत्तेचा गुळंबा चाखत आहेत. परंतू घर फिरल्यानंतर घराचे वासेही फिरतात, तद्वत जिकडे सत्ता तिकडे वहिवाट, असे म्हणत विधान परिषदेची सुभेदारी राखण्यासाठी राज्यात सत्तांतर होताच भाजपात प्रवेश करण्याचा मनसुबा रचलेला आहे. येत्या दोनच दिवसांत ते भाजपवासी होतील. मात्र, ज्या शरद पवारांनी सभापती महोदयांना टोकाचा विरोध असतानाही पसा पसा भरुन दिले, तेच सभापती महोदय शरद पवारांना उतार वयात कृतघ्नतेचे चटके देणार काय, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तीन सिंहांच्या इलाक्यात सभापतींचा टिकाव लागणार काय?
सुमारे तीन वर्षांपूर्वी सातार्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे भरलेले ताट धुडकावत भाजपात प्रवेश केला होता. खरेतर ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला तो फार मोठा धक्का होता. राष्ट्रवादीच्या हक्काचा माढा लोकसभा मतदारसंघ फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी नेस्तनाबूत करुन तो भाजपकडे खेचून आणला होता. तर माण-खटावमधून तीन टर्म लढविणार्या जयकुमार गोरे यांनी भाजपचे कमळ फुलवले होते. खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आ. जयकुमार गोरे हे भाजपचे कद्दावर नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दोस्त-यार. आणि या तिघांचे सभापती महोदयांबरोबर विळ्या भोपळ्याचे वैर. ज्या कारणासाठी सासू ला नकार दिला, तीच शेवटी वाट्याला आली. परंतू केवळ पद वाचविण्यासाठी सभापती महोदयांनी ऐन वार्धक्यात नवी सोयरिक शोधली आहे. खा. उदयनराजे, खा. रणजितसिंह, आ. जयकुमार गोरे या तीन सिंहांच्या इलाक्यात सभापती महोदयांचा टिकाव लागणार काय, येत्या काळात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.