महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.
सातारा : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची संयुक्त बैठक होऊन दोन्ही राज्यांना काळजी घेण्याच्या सूचना अमित शहा यांनी केल्या असतानाही कर्नाटककडून आज मराठी भाषिकांच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नावरून महाराष्ट्राच्या एकसंघतेला तडा जाण्याचे काम होत आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.
ते पुढे म्हणाले, गेल्या महिन्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती आणखीनच चिघळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण होऊ नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या होत्या, अशी माहिती प्रसिद्ध माध्यमांकडून मिळाली होती. आज सोमवारी कर्नाटक दिन असताना बेळगाव भागात मराठी भाषिकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून आले. दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सूचना देऊनही अशा प्रकारचे कृत्य कर्नाटक सरकारकडून होत असेल तर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची संपूर्ण जनता या सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहे ही भूमिका स्पष्ट करून महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली.