सातारा ते मुंबई महामार्गावरील नर्हे स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४७ वाहनांना जोरदार धडक दिली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला.
सातारा : सातारा ते मुंबई महामार्गावरील नर्हे स्मशानभूमीच्या वरील बाजूला असलेल्या भूमकर पुलाजवळ एका ट्रेलरने उतारावर ४७ वाहनांना जोरदार धडक दिली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात एकाच हाहाकार उडाला.
रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या ट्रेलरने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४७ हून अधिक वाहनांना धडक दिली. त्यात प्रामुख्याने कारचा समावेश आहे. त्यानंतर ओम लॉजिंगच्या समोरील बाजूला हा ट्रेलर जाऊन थांबला.
नवीन कात्रज बोगद्यापासून सुरु होणारा तीव्र उतार हा गेल्या काही वर्षांपासून मृत्युचा स्पॉट बनला आहे. आंध्र प्रदेशाचा हा ट्रेलर साताराकडून मुंबईकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथ गतीने सुरु होती. वेगाने आलेल्या ट्रेलरचालकाचे नियंत्रण सुटले. त्याने एका पाठोपाठ पुढे असलेल्या गाड्यांना धडका देण्यास सुरुवात केली. त्यात काही कार्स उलट्या झाल्या. त्यातील प्रवासी जखमी झाले. एका पाठोपाठ त्याने जवळपास ३० हून अधिक वाहनांना धडक दिल्यानंतर तो एका ठिकाणी थांबला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल, पीएमआरडीए चे अग्निशामक दल, रेस्यु वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिक लोकांनी गाड्यांमधील लोकांना बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये रवाना केले आहे. संपूर्ण महामार्गावर एकच गोंधळ उडाला असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली.