ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले.
सातारा : ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले.
दि. २२ मार्च जागतिक जल दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्हा परिषदेचे जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, कृषी अधिकारी विजय माईणकर यावेळी उपस्थित होते.
महादेव घुले पुढे म्हणाले, सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी लोकसहभागातून या सप्ताहामध्ये पाण्याच्या स्तोत्रांची साफसफाई करून स्तोत्र बळकटी करण्याच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळकनेक्शनद्वारे शुद्ध व स्वच्छ ५५ लिटर प्रति व्यक्ती पाणी देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. सध्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेतली असून या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १० टक्के लोकवर्गणी बंधनकारक केलेली आहे. लोकवर्गणी ही स्वामित्वाच्या भावनेसाठी असून लोकवर्गणी जमा न केल्यास गावांना नळ योजना पूर्ण करण्यासाठी पुढील हप्ते दिले जाणार नाही. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे.
प्रारंभी पाण्याविषयी प्रबोधन करणार्या पोस्टर्स व स्टिकरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मनोज जाधव यांनी उपस्थित असणाऱ्या सर्वांना जल शपथ दिली. सूत्रसंचालन अजय राऊत यांनी केले तर आभार राजेश भोसले यांनी मानले. यावेळी एस. एस. जाधव, आनंद जोशी, ऋषिकेश शीलवंत, संजय पवार, धनाजी पाटील, रवींद्र सोनवणे, गणेश चव्हाण, मनोज विधाते, आदी उपस्थित होते.