धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात काल पुणे-बंगळूर महामार्ग रोको करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मागील अडीच तासापासून ठप्प झाली. धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला.
सातारा : धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात काल पुणे-बंगळूर महामार्ग रोको करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि सातारा बाजूकडे पंधरा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक मागील अडीच तासापासून ठप्प झाली. धनगर आरक्षणासाठी समाजाच्या वतीने महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे खंडाळा येथे रास्ता रोको करण्यात आला.
धनगर समाजाला एस टी चे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हजारो धनगर बांधव महिला युवक युवती या रस्ता रोको मध्ये सहभागी झाले. 'येळकोट येळकोट, जय मल्हार'च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. आरक्षणाच्या मागणीला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. यासाठी चार दिवसांपूर्वी आयोजित खंडाळा तालुका बंदला मोठा प्रतिसाद मिळाला होता. खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शासन दखल घेत नसल्याने समाजाच्या बांधवांनी नीरा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. आरक्षणासाठी गणेश केसकर यांच्या उपोषणाच्या तेराव्या दिवशी शासनाचा तेरावा घालण्यात आला. यानंतरही शासन लक्ष देत नसल्याने काल पुणे-बंगलोर महामार्ग बंद करण्यात आला.
लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशीकरिता गेल्या पंधरा दिवसांपासून गणेश केसकर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल शासनस्तरावर घेतली जात नसल्याने धनगर समाजाने एल्गार पुकारत खंडाळा तालुका बंद व नंतर महामार्ग बंदची हाक दिली होती. केसरकर यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी शासकीय व राजकीय प्रयत्न करण्यात आले होते. पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार मकरंद पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. कालच्या रास्ता रोकोत महिला, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महामार्गावर बकऱ्या सोडून महामार्ग अडविण्यात आला. महामार्ग बंद करण्यात आल्याने सातारा, कोल्हापूर, सांगली, बंगळूर व पुणे-मुंबई कडे जाणारा रस्ता बंद झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. अनेकांनी भोर- मांढरदेव- वाई मार्गे साताऱ्याकडे जाण्यासाठी मार्ग अवलंबला. महामार्ग रोखण्यात येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.